मनोमित्र प्रकल्प राज्यासाठी दिशादर्शक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2021 04:26 AM2021-05-24T04:26:08+5:302021-05-24T04:26:08+5:30
इस्लामपूर : कोरोनारुग्ण व नातेवाइकांचे मनोबल वाढविण्यासाठी जिल्हा प्रशासन व जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाने हाती घेतलेला विश्वास हेल्पलाईन व मनोमित्र ...
इस्लामपूर : कोरोनारुग्ण व नातेवाइकांचे मनोबल वाढविण्यासाठी जिल्हा प्रशासन व जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाने हाती घेतलेला विश्वास हेल्पलाईन व मनोमित्र प्रकल्प राज्यासाठी दिशादर्शक ठरेल, असे मत राज्य आरोग्य संचालिका डॉ. साधनाताई तायडे यांनी व्यक्त केले.
जिल्ह्यातील कोरोना परिस्थिती, वैद्यकीय सुविधा यांबाबतच्या पाहणीसाठी त्या जिल्ह्याच्या दौऱ्यावर आल्या होत्या. यावेळी त्यांनी येथील शुश्रूषा, सल्ला, मार्गदर्शन व प्रशिक्षण संस्थेने जिल्हा प्रशासनाच्या वतीने भयमुक्त कोरोना मुक्तीसाठी सुरू केलेल्या ‘विश्वास कोरोनाशी लढण्याचा’ या अभिनव उपक्रमाची माहिती व आढावा घेतला.
यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय साळुंखे, कालिदास पाटील यांनी प्रकल्प उद्दिष्टे, कार्यपद्धती व प्रशासनाची भूमिका स्पष्ट केली. जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रामध्ये प्रथमच सांगली जिल्ह्यामध्ये सुरू झालेल्या या प्रकल्पाच्या कार्यपद्धतीचे त्यांनी कौतुक केले. उपक्रमात कोल्हापूर येथील ‘सायबर’च्या समाजविज्ञान विभागातील ८५ विद्यार्थी व प्राध्यापकांनी ‘मनोमित्र’ म्हणून सहभाग घेतला. जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. मिलिंद पोरे, कोल्हापूर आरोग्य विभाग उपसंचालक डॉ. हेमंत बोरसे, तालुका आरोग्याधिकारी डॉ. साकेत पाटील व आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.