मानसिंग बँकेस चार कोटींचा नफा : जे. के. बापू जाधव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2021 04:26 AM2021-04-02T04:26:34+5:302021-04-02T04:26:34+5:30
दुधोंडी : मानसिंग को-ऑप. बँकेस ३१ मार्च २०२१ अखेर संपलेल्या आर्थिक वर्षात चार कोटी एक लाख रुपये नफा ...
दुधोंडी : मानसिंग को-ऑप. बँकेस ३१ मार्च २०२१ अखेर संपलेल्या आर्थिक वर्षात चार कोटी एक लाख रुपये नफा झाल्याची माहिती बँकेचे संस्थापक जे. के. (बापू) जाधव यांनी दिली.
ते म्हणाले की, मानसिंग बँक ही ग्रामीण भागातील एक अग्रेसर बँक आहे. अल्पावधित बँकेला राष्ट्रीय तसेच राज्य पातळीवरील विविध पुरस्कार मिळाले आहेत. कोरोनासारख्या संकटातही बँकेने सभासदांच्या विश्वासास पात्र राहत सामाजिक बांधिलकी जपली आहे.
बँकेचे अध्यक्ष सुधीर जाधव म्हणाले की, मार्चअखेर बँकेकडे ५९०६ सभासद असून बँकेकडे एकूण ठेवी १६० कोटी ३२ लाख आहेत. कर्जवाटप १२१ कोटी ८३ लाख इतके आहे. गुंतवणूक ४८ कोटी ४८ लाख आहे. तसेच बँकेचा नेट एन.पी.ए. शून्य टक्के इतका असून सी.आर.ए.आर ११.७४ टक्के आहे. प्रती कर्मचारी व्यवसाय सहा कोटी ५६ लाख आहे. बँकेची थकबाकी ४.४५ टक्के इतकी असून बँकेचे भागभांडवल चार कोटी ४० लाख इतके आहे. बँकेचा एकूण राखीव व इतर निधी १४ कोटी ६६ लाख इतका असल्याची माहिती त्यांनी दिली.
तसेच बँकेला आयएफएससी कोड असल्यामुळे आरटीजीएस व एनईएफटीमुळे त्वरित फंड जमा होतात. ग्राहकांच्या सेवेसाठी बँकेने कोअर बँकिंग प्रणाली चालू केलेली असून मुख्य शाखा दुधोंडी येथे एटीएम, कॅश डिपाॅझिट मशीन व पासबुक प्रिंटिंग मशीन बसवले आहे, अशी माहिती उपाध्यक्ष शीतल सावळवाडे व जनरल मॅनेजर संभाजी जाधव यांनी दिली.
यावेळी बँकेचे संचालक हणमंत कारंडे, प्रा. दौलत लोखंडे, बाळासाहेब कदम, शाखाधिकारी प्रकाश आरबुणे, बाबासाहेब जाधव, राजेश नेणे, अभिजित कत्ते उपस्थित होते