गटबाजीमुळेच मणेराजुरीला संचालकपद नाही!
By admin | Published: July 9, 2015 11:36 PM2015-07-09T23:36:29+5:302015-07-09T23:36:29+5:30
रामानंद भारती सूतगिरणी : तासगाव बाजार समितीतही फटका बसण्याची शक्यता
अशोक जमदाडे - मणेराजुरी -राष्ट्रवादीतील गटबाजीमुळे मणेराजुरी (ता. तासगाव) गावाने स्वामी रामानंद भारती सूतगिरणीतील संचालक पदाची संधी गमावली. या गटबाजीचा फटका बाजार समिती निवडणुकीतही बसण्याची शक्यता आहे.
मणेराजुरीला गटबाजी आणि पाडापाडीचा मोठा इतिहास आहे. त्यामुळे तालुक्यातील तासगावनंतर सर्वांत मोठ्या असणाऱ्या मणेराजुरी गावाला जिल्हा पातळीवर व तालुका पातळीवर पदापासून वंचित राहावे लागत आहे. सूतगिरणी निवडणुकीवेळी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी मणेराजुरीला संधी मिळणार असल्याचे उमेदवारांना सांगण्यात आले होते; पण ऐनवेळी नावे जाहीर करण्यात आली. त्यामध्ये मणेराजुरीला डावलण्यात आल्याने प्रचंड नाराजी पसरली. माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्या कारकीर्दीत मणेराजुरीला मागील वेळी दोन पदे देण्यात आली होती. यंदा सूतगिरणीसाठी माजी संचालक दिलीप पवार, अशोक पवार व राष्ट्रवादी युवकचे अध्यक्ष खंडू पवार, माजी सरपंच बबनराव जमदाडे यांनी उमेदवारीची मागणी केली होती. दिलीप पवार यांना संधी मिळणार, अशी खात्री होती. त्यांचे नावही आघाडीवर होते; पण संख्या जास्त असल्याने चौघांनाही डावलण्यात आले.
जिल्हा बँकेच्या निवडणुकीतही माजी संचालक जयवंतराव पाटील, सुभाष कांबळे व पंचायत समितीचे माजी सदस्य सतीश पवार यांनी अर्ज दाखल केले होते.
राष्ट्रवादी व भाजपची युती झाल्यानंतर राष्ट्रवादीने सतीश पवार यांना उमेदवारी दिली. मणेराजुरीतील राष्ट्रवादीत सतीश पवार, दिलीप जमदाडे, योजना शिंंदे, स्वाती लांडगे यांचा एक गट आहे, तर दिलीप पवार, जयवंतराव पाटील, सुभाष कांबळे यांचाही जुना गट आहे. या दोन्ही गटांचे सूर जुळत नाहीत. मागील पंचायत समिती निवडणुकीत सतीश पवार यांनी राष्ट्रवादीत बंडखोरी करून दिलीप पवार यांचा पराभव केला होता. त्या पराभवाची सल त्यांच्या मनामध्ये होती. त्यामुळे त्यांनी जुन्या गटाला एकत्र करून जिल्हा बँकेच्या निवडणुकीत सतीश पवार यांचा पराभव केल्याची चर्चा आहे. सूतगिरणीसाठी दिलीप पवार यांना संधी देण्यात येऊ नये म्हणून दुसऱ्या गटाने प्रयत्न केले असल्याचे बोलले जाते.
या वादामुळे मणेराजुरीला डावलण्यात आले व १५ वर्षांपासून मिळत असणारे संचालकपद गमवावे लागले. आता बाजार समितीसाठी राष्ट्रवादी व भाजपची युती झाल्यास मणेराजुरीला पुन्हा फटका बसण्याची शक्यता आहे.
वर्चस्व असूनही उपेक्षा
मणेराजुरीतील राष्ट्रवादीच्या सतीश पवार, दिलीप जमदाडे, योजना शिंदे, स्वाती लांडगे यांचे ग्रामपंचायत व विकास सोसायटीमध्ये निर्विवाद वर्चस्व असूनही वरिष्ठ पातळीवर या गटाला संधी देण्यात येत नाही, अशी खंत कार्यकर्त्यांत आहे.
आम्हाला नाही,
तर तुम्हालाही नाही!
मणेराजुरीतील गटबाजी नेहमीचीच आहे. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीवेळी संजयकाका पाटील राष्ट्रवादीत होते. त्यामुळे राष्ट्रवादीतील आर. आर. पाटील (आबा) गटाने संजयकाका पाटील यांच्याबरोबर युती केली होती. त्यावेळी मणेराजुरी जिल्हा परिषद गट संजयकाका यांच्या गटाच्या वाट्याला गेला होता. परिणामी आबा गटातील माजी सरपंच सुभाष शिंदे यांच्या पुढाकाराने राष्ट्रवादीत बंडखोरी झाली होती. या गटाने जिल्हा परिषदेला योजना शिंदे, तर पंचायत समितीला स्वाती लांडगे, विश्वास पाटील यांना उभे केले होते. त्या निवडणुकीत संजयकाकांच्या तिन्ही उमेदवारांचा पराभव झाला होता. त्याचा वचपा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत संजयकाका गटाने काढला व सतीश पवार यांचा पराभव झाला. ‘आम्हाला नाही, तर तुम्हालाही नाही’, या उक्तीप्रमाणे राष्ट्रवादीतील दोन्ही गट एकमेकांवर कुरघोड्या करत आहेत.