ऊस दराबाबत कारखानदारांचे मौनच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2019 04:27 PM2019-11-30T16:27:07+5:302019-11-30T16:28:33+5:30
कारखानदारांची ही भूमिका लक्षात घेतल्यास, राजू शेट्टी यांनी जाहीर केलेली एफआरपी अधिक २०० रुपये शेतक-यांच्या पदरात पडतील, अशी परिस्थिती दिसत नाही. यामुळे शेतकºयांनी सावध भूमिका घेण्याची गरज आहे.
सांगली : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खा. राजू शेट्टी यांनी, एफआरपी अधिक २०० रुपये कारखानदारांनी जाहीर करुन गळीत हंगाम सुरु करण्याचे आवाहन केले होते. सांगली जिल्ह्यातील बहुतांशी कारखान्यांचे गळीत हंगाम सुरु झाले आहेत. पण, एकाही कारखान्याने दराची घोषणा केलेली नाही. साखर कारखानदारांशी संपर्क केला असता, त्यांनी दराच्या कोंडीबाबत सावध भूमिका घेत बोलणे टाळले आहे. कारखानदारांच्या मौनाबाबत शेतक-यांमध्येही उलट-सुलट चर्चा रंगल्या आहेत.
महापूर आणि अवकाळी पावसामुळे ऊस उत्पादकांसह सर्वच शेतक-यांचे मोठे नुकसान झाले आहे. यावर्षीच्या गळीत हंगामामध्ये उसाला दर किती असणार, याकडे शेतक-यांचे लक्ष लागून राहिले आहे. कारखानदार गळीत हंगाम सुरु करताना दराची नेहमीच घोषणा करतात. पण, यावर्षी सर्वच कारखानदारांनी गळीत हंगाम सुरु करताना दराची घोषणाच केली नाही.
कारखानदारांच्या या भूमिकेवर शेतक-यांनी नाराजी व्यक्त केली आहे. ऊस दराच्या कोंडीवर स्वाभिमानी शेतकरी संघटना, शेतकरी संघटना, बळीराजा शेतकरी संघटना, जोशीप्रणित शेतकरी संघटना गप्पच आहेत. ऊस दराबाबत साखर कारखानदारांशी संपर्क साधला असता, अनेकांनी, आमची कशाला प्रतिक्रिया? असे म्हणून बोलणेच टाळले. काही कारखानदारांनी शेतकºयांना योग्य दर मिळेल, असे पोकळ आश्वासन दिले. साखर कारखानदारांच्या या मौनामध्ये दडलंय काय, असा सवालही शेतक-यांनी उपस्थित केला आहे.
काही कारखानदारांनी तर एकरकमी एफआरपी देणेही कठीण असल्याचे सांगितले आहे. साखरेचे दर वाढले नसल्यामुळे एफआरपी तीन टप्प्यामध्ये देण्याचा कारखानदारांचा विचार सुरु आहे. पहिल्या टप्प्यात ८० टक्के, दुसरे दोन टप्पे १० टक्के देण्याबाबत साखर कारखानदारांमध्ये चर्चा चालू आहे. कारखानदारांची ही भूमिका लक्षात घेतल्यास, राजू शेट्टी यांनी जाहीर केलेली एफआरपी अधिक २०० रुपये शेतक-यांच्या पदरात पडतील, अशी परिस्थिती दिसत नाही. यामुळे शेतकºयांनी सावध भूमिका घेण्याची गरज आहे.