मणेराजुरीचे स्टोनक्रशर बेकायदेशीरच
By Admin | Published: August 17, 2016 10:51 PM2016-08-17T22:51:13+5:302016-08-17T23:12:21+5:30
अमित शिंदे यांची माहिती : पोस्ट चुकीची, कायदेशीर कारवाई करणार
तासगाव : मणेराजुरी येथील बेकायदेशीर स्टोनक्रशरबाबत प्रवीण जमदाडे, मोहन कोरे, बजरंग एरंडोले यांनी दाखल केलेल्या याचिकेमध्ये जिल्हा प्रशासनाने केलेल्या कारवाईबाबतचा अहवाल हरित न्यायालयात सादर करण्यात आला. याबाबत अॅड. अमित शिंदे यांनी माहिती दिली. याप्रकरणी तक्रारदारतर्फे अॅड. असीम सरोदे व अॅड. अमित शिंदे काम पाहत आहेत.
तहसीलदार भोसले यांनी केलेल्या प्रतिज्ञापत्रामध्ये मणेराजुरी येथे सुरु असलेल्या १० पैकी आठ स्टोनक्रशरना सील करण्यात आले आहे. सील तोडून स्टोनक्रशर सुरु करणाऱ्या मालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, न्यायालयाने त्यांना चार दिवसांची कोठडीही दिलेली आहे. प्रशासनातर्फे वर्षाअखेरीस रॉयल्टीबाबत अहवालदेखील तयार केलेला आहे. परवानगीपेक्षा जास्त उत्खनन करणाऱ्या स्टोनक्रशरला नोटीसही दिलेली आहे. प्रतिज्ञापत्रासोबत १८ जूनरोजी सुजाता चौगुले यांना रॉयल्टीबाबत दिलेले पत्रदेखील हजर केले आहे. प्रतिज्ञापत्रामध्ये पुढे, शिवदत्त हा स्टोनक्रशर शिवाजी कोरे यांच्या घरापासून ६७० मीटर अंतरावर असल्याचे गुगल मॅपवरून दिसत असल्याचे म्हटले आहे. तसेच शिवाजी कोरे यांच्या घराची पडझड शिवदत्तमुळे झाल्याचे वाटत आहे, असे प्रथम नमूद करून त्यांनतर याबाबत केलेला पंचनामा हा दबावामुळे तयार केल्याबाबत अर्जुन साठे या गावकामगार तलाठ्याचे प्रतिज्ञापत्रदेखील हजर केलेले आहे. तसेच शिवाजी कोरे यांच्या घराची पडझड कशामुळे झाली, याबाबतची तांत्रिक माहिती नसल्याचे नमूद करण्यात आले आहे. हे स्टोनक्रशर कायदेशीर असल्याचा अहवाल सादर केल्याबाबत सोशल मीडियावरून मेसेज फिरत आहेत. (वार्ताहर)
अहवाल सादर : पुढील सुनावणी ८ सप्टेंबर रोजी
हरित न्यायालयामध्ये मणेराजुरी (ता. तासगाव) येथील स्टोनक्रशरबाबतीत दाखल झालेल्या याचिकेमध्ये जिल्हाधिकारी, जिल्हा खणीकर्म अधिकारी, सांगली व तहसीलदार, तासगाव यांनी प्रतिज्ञापत्रावर सादर केलेल्या अहवालानुसार मौजे मणेराजुरी येथील स्टोनक्रशर यांना जिल्हा उद्योग केंद्र सांगली, महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ व महसूल विभागाचे बिगरशेती परवाने असून, सर्व परवाने व परवानग्या पडताळून पाहिल्या असता, ते सर्व कागदपत्रे रितसर असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले आहे. याबरोबर याचिकाकर्त्यांनी केलेले आरोप हे आकसापोटी असल्याचेही न्यायालयाच्या दृष्टीला आणून देण्यात आले आहे. हरित न्यायालयाने वरील सर्व बाबींची दखल घेतली असून, पुढील सुनावणी ८ सप्टेंबर रोजी होणार आहे.
तसेच एकीकडे स्टोनक्रशरवर केलेल्या कारवाईची माहिती देत दुसरीकडे न्यायालयाची दिशाभूल करण्याच्या उद्देशाने संदिग्ध स्वरूपाचे प्रतिज्ञापत्र शपथेवर दाखल करणाऱ्या तहसीलदार सुधाकर भोसले यांच्यावर कायदेशीर कारवाई करणार असल्याचेदेखील अॅड. अमित शिंदे यांनी सांगितले