मिरजेतील अनेक पराभूत उमेदवार न्यायालयात जाणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2018 09:29 PM2018-08-10T21:29:58+5:302018-08-10T21:31:36+5:30
महापालिका निवडणूक मतमोजणी व निकालानंतर मिरजेतील अनेक पराभूत उमेदवार न्यायालयात दाद मागण्याच्या पवित्र्यात आहेत.
मिरज : महापालिका निवडणूक मतमोजणी व निकालानंतर मिरजेतील अनेक पराभूत उमेदवार न्यायालयात दाद मागण्याच्या पवित्र्यात आहेत. प्रभाग तीन, चार, पाच, सात व वीसमधील पराभूत उमेदवार मतमोजणीतील त्रुटी, मतदान यंत्रातील घोटाळा यासह वेगवेगळ्या कारणांनी न्यायालयात जाणार असल्याने, यापुढे प्रभागातील संघर्ष न्यायालयात होणार आहे.
मिरजेत महापालिका निवडणुकीत अनेक धक्कादायक निकाल लागले आहेत. या निकालाबाबत असमाधानी असलेले पराभूत उमेदवार न्यायालयीन लढ्याच्या तयारीत आहेत. निवडणूक निकालाविरोधात दहा दिवसात न्यायालयात याचिका दाखल करणे आवश्यक असल्याने, निवडणूक प्रक्रियेची कागदपत्रे मिळविण्यासाठी उमेदवारांची धावपळ सुरू आहे.
प्रभाग वीसमध्ये निवडून आलेले भाजप उमेदवार गणेश माळी महापालिकेचे सेवा पुरवठादार असल्याने त्यांच्या निवडीला काँग्रेस उमेदवार किशोर जामदार न्यायालयात आव्हान देणार आहेत. प्रभाग चारमध्ये मतदानाची व मतमोजणीची आकडेवारी जुळत नसल्याने अपक्ष उमेदवार अनिलभाऊ कुलकर्णी व शुभांगी रूईकर न्यायालयात दाद मागणार आहेत. प्रभाग तीनमध्ये शिवसेनेच्या मालन गणेशवाडे, श्वेता गव्हाणे, राष्टÑवादीच्या यास्मिन चौधरी मतदान व मतमोजणी प्रक्रियेतील त्रुटींबाबत विजयी उमेदवाराच्या निवडीला आव्हान देणार आहेत.
याच प्रभागातील काँग्रेस उमेदवार सचिन जाधव व अजित दोरकर हे मतदानाच्या दिवसापूर्वी मतदान केंद्रावरील मतदारांच्या संख्येची अदलाबदल करण्यात आल्याच्या कारणावरून न्यायालयात जाणार आहेत. प्रभाग पाचमध्ये अपक्ष तानाजी रूईकर यांचाही, मतमोजणी प्रक्रियेत त्रुटी असल्याचा आक्षेप आहे. प्रभाग वीसमध्ये केवळ सात मतांनी पराभूत झालेले माजी महापौर विवेक कांबळे यांची फेरमतमोजणीची मागणी आहे. जिल्हा सुधार समितीचे अॅड. अमित शिंदे यांनीही, ज्या प्रभागात मतदान व मतमोजणीच्या आकडेवारीत गोंधळ आहे, तेथील विजयी उमेदवाराच्या निवडीस सुधार समिती आव्हान देणार असल्याचे सांगितले. सोमवार दि. १३ पर्यंत न्यायालयात याचिका दाखल करावयाची असल्याने निवडणूक प्रक्रिया व निकालाची कागदपत्रे घेण्यासाठी महापालिका कार्यालयात पराभूत उमेदवार व प्रतिनिधींची गर्दी होती