मोलकरणींना अनेक दरवाजे बंद, कुटुंबाचा गाडा चालणार कसा?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2021 04:23 AM2021-04-14T04:23:27+5:302021-04-14T04:23:27+5:30
सांगली : लोकांच्या घरात धुणी, भांडी करून आपल्या कुटुंबाच्या पोटाचा प्रश्न सोडविण्यासाठी धडपडणाऱ्या हजारो मोलकरणींना आता अनेक घरांचे दरवाजे ...
सांगली : लोकांच्या घरात धुणी, भांडी करून आपल्या कुटुंबाच्या पोटाचा प्रश्न सोडविण्यासाठी धडपडणाऱ्या हजारो मोलकरणींना आता अनेक घरांचे दरवाजे बंद झाले आहेत. त्यामुळे घर चालवायचे कसे, पोटाला खायचे तरी काय? असे प्रश्न त्यांना आता सतावत आहेत.
सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिका क्षेत्रात मोलकरणींची संख्या मोठी आहे. स्वत:च्या घरातली कामे करून दुसऱ्यांच्या घरातील कामे करीत घर चालविणाऱ्या या महिलांना मागील वर्षी कोरोनाने मोठा फटका बसला. या काळात त्यांचे आर्थिक गणित कोलमडून पडले. येथील मोलकरीण संघटनेने शासनाकडे मदतही मागितली, मात्र अद्याप त्यांना कोणतीही मदत मिळाली नाही.
एकीकडे शासनाची मदत नसताना आता कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने त्यांना उद्ध्वस्त केले आहे. अनेक घरांची दारे या महिलांसाठी बंद झाली. महागाई वाढत असताना बेराेजगार होऊन कामाच्या शोधात अनेक महिला फिरत आहेत. त्यांना इतरत्रही काम मिळणे मुश्किल झाले आहे. अनेक घरकामगार महिलांच्या मुलांना शैक्षणिक अडचणी येत आहेत.
चौकट
एका घरातून मिळतात ५०० रुपये
एका घरातील धुणी, भांडी केल्यानंतर त्या महिलेस महिन्याकाठी केवळ ४०० ते ५०० रुपये दिले जातात. बारा तास जर एखाद्या घरात काम केले तर महिन्याकाठी १ ते १५०० रुपये दिले जातात. ९ ते १० घरांची धुणी, भांडी करून या महिलांना केवळ ५ हजार रुपयेच मिळतात.
चौकट
घर कसे चालवायचे याचीच चिंता
घरकाम करणाऱ्या महिलांनी सांगितले की, गॅस महागला, खाद्यतेल महागले, मुलांच्या शिक्षणाचा खर्च महागला असताना दसऱ्या बाजूने रोजगारही हातातून जात आहे. त्यामुळे घर चालवायचे कसे, याची चिंता लागली आहे. चार ते पाच हजारात महिन्याचा खर्च भागत नाही. तरीही कोरोनाच्या काळात आहे तो तरी रोजगार टिकावा म्हणून धडपड सुरू आहे.
कोट
मोलकरीण म्हणून काम करणाऱ्या महिलांच्या आयुष्यातील अंधार कोणाला दिसणार आहे की नाही? शासनाने मदत केली नाही. दुसरीकडे गरिबीचे चटके सोसत या महिला जगण्याची व कुटुंब जगविण्याची धडपड करीत आहेत.
-विद्या स्वामी, अध्यक्षा, घरकामगार महिला संघटना
कोट
दहा ते पंधरा वर्षांपासून काम करीत आहे. तरी रोजगार बेभरवशाचा आहे. पन्नाशी गाठलेल्या घरकामगार महिलांना तर सर्वठिकाणची दारे बंद आहेत. त्यामुळे बेरोजगार झाल्यानंतर कुटुंब जगवायचे कसे, याची चिंता सतावत आहे.
-बबिता कन्नुरे, सांगली
कोट
घरकामगार महिलांच्या व्यथांना कोणीही वाली नाही. परिस्थिती चांगली असणाऱ्यांना पिवळे कार्ड आणि पाच हजार रुपयेसुद्धा न मिळणाऱ्या मोलकरणींना केशरी कार्ड दिले जाते. एकीकडे रोजगार नाही, दुसरीकडे धान्य नाही, अशी विचित्र परिस्थिती आहे.
- सुमन चंदुरे, कुपवाड