सांगली: शिवसेना जिल्हाप्रमुखपदासाठी अनेकांची ‘फिल्डिंग’
By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2022 04:41 PM2022-07-14T16:41:45+5:302022-07-14T16:43:36+5:30
आनंदराव पवार यांनी काही दिवसांपूर्वीच एकनाथ शिंदे यांच्या गटात प्रवेश केल्याने जिल्हाप्रमुखपद रिक्त झाले
अविनाश कोळी
सांगली : शिवसेनेचे आमदार अनिल बाबर यांच्यापाठोपाठ जिल्हाप्रमुख आनंदराव पवार यांनीही एकनाथ शिंदे गटाला पाठबळ दिल्याने जिल्ह्यातील शिवसेनेला धक्का बसला आहे. आता पवार यांच्या जागी नवा जिल्हाप्रमुख नियुक्त करण्यासाठी पक्षाकडून चाचपणी केली जात आहे. या पदावर वर्णी लागावी म्हणून जिल्ह्यातील अनेकांनी ‘फिल्डिंग’ लावली आहे.
पक्षप्रमुख व माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी निकटवर्तीय नेत्यांना सतर्क केले आहे. प्रत्येक जिल्ह्यातील पदाधिकारी पक्षाबरोबर एकसंध कसे राहतील याची काळजी घेण्याची व जे पदाधिकारी सोडून गेले त्यांच्या जागी नव्या नियुक्तीची सूचना दिली आहे. याची जबाबदारी संपर्कप्रमुखांवर सोपविली आहे. सांगली जिल्ह्याचे संपर्कप्रमुख नितीन बानुगडे-पाटील यांच्या हाती निवडीचे दोर आहेत. त्यांनीही आतापासून जिल्हाप्रमुखपदासाठी चाचपणी सुरू केली आहे. सक्रिय असलेल्या पदाधिकारी किंवा कार्यकर्त्याला या पदावर संधी दिली जाण्याची शक्यता आहे.
यासाठी दुसरे जिल्हाप्रमुख संजय विभुते यांचेही मत विचारात घेतले जाणार आहे. पक्षातील एकसंधपणा टिकावा व सर्वांना सोबत घेऊन जाणारा जिल्हाप्रमुख असावा, यासाठी प्रयत्न केले जात आहेत. त्यामुळे पक्षांतर्गत हालचाली गतिमान झाल्या आहेत. मुंबईत यासाठी दोन बैठकाही पार पडल्या.
आनंदराव पवार यांनी काही दिवसांपूर्वीच एकनाथ शिंदे यांच्या गटात प्रवेश केल्याने जिल्हाप्रमुखपद रिक्त झाले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून हे पद त्यांच्याकडे होते. इस्लामपूर नगरपालिकेत त्यांनी पक्षाचे स्वतंत्र अस्तित्व निर्माण केले होते. त्यामुळे त्यांच्या पक्षातून जाण्याने शिवसेनेला धक्का बसला आहे. आ. अनिल बाबर यांच्या बंडखोरीतून सावरत असतानाच पवारांच्या बंडखोरीने पक्षाला दुहेरी फटका बसला आहे. अन्य सर्व पदाधिकारी सध्या तरी उद्धव ठाकरेंसोबत आहेत. यासाठी नितीन बानुगडे-पाटील यांनी प्रयत्न केले आहेत.
जिल्ह्यातून ही नावे चर्चेत
माजी जिल्हाप्रमुख बजरंग पाटील, उपजिल्हाप्रमुख शंभूराज काटकर, चिकुर्डे येथील माजी जिल्हा परिषद सदस्य अभिजित पाटील, मिरजेतील माजी जिल्हाप्रमुख विकास सूर्यवंशी यांची नावे चर्चेत आहेत. त्यांच्या समर्थकांनी त्यासाठी ‘फिल्डिंग’ लावली आहे.
अभिजित पाटील आघाडीवर
आनंदराव पवार यांच्या जागी वाळवा तालुक्यातीलच कार्यकर्त्याला संधी देण्याचा विचार सुरू आहे. त्यातच मिरज, कवठेमहांकाळ येथील काही जुन्या कार्यकर्त्यांनी अभिजित पाटील यांच्यासाठी आग्रह धरला आहे. त्यामुळे त्यांचे नाव सध्या जिल्हाप्रमुखपदासाठी आघाडीवर आहे.