मरळनाथपूरचा घोटाळा विधिमंडळात! धनंजय मुंडे यांच्याकडून आरोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2018 11:11 PM2018-03-30T23:11:18+5:302018-03-30T23:11:18+5:30
इस्लामपूर : विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन संपण्याच्या शेवटच्या दिवशी कृषी विभागाच्या कोरडवाहू शेती अभियानांतर्गत कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या मरळनाथपूर या गावातच झालेल्या घोटाळ्यावरुन
इस्लामपूर : विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन संपण्याच्या शेवटच्या दिवशी कृषी विभागाच्या कोरडवाहू शेती अभियानांतर्गत कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या मरळनाथपूर या गावातच झालेल्या घोटाळ्यावरुन घमासान माजले. या प्रकरणात खोत यांना घेरण्याचा पुरेपूर प्रयत्न राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केला. मात्र सदाभाऊ खोत यांनी आरोपांना कागदोपत्री पुरावे सादर केले.
अर्थसंकल्पीय अधिवेशनातील अंतिम आठवडा प्रस्तावावरील चर्चेवेळी राष्ट्रवादीचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी, मरळनाथपूर येथे कोरडवाहू शेती अभियानांतर्गत योजनेचा लाभ देताना अनियमितता आणि कायद्याची चाकोरी सोडून काम झाल्याचा आरोप केला. २0१४—१५ ला मरळनाथपूर गावाची कोरडवाहू शेती अभियानासाठी निवड झाली. या योजनेचा लाभ जवळचे नातेवाईक आणि आप्तेष्टांना दिला गेला आहे. मंत्री खोत यांचे भाचे संदीप शामराव खोत यांची जमीन आणि ट्रॅक्टर नसताना त्यांना अवजारे दिली गेली. सुनील मारुती खोत यांचे क्षेत्र २0 गुंठ्यापेक्षा कमी असताना त्यांना ४ लाखांहून अधिकची अवजारे दिली गेली. महादेव ज्ञानू पावणे यांना २ लाखाहून अधिकची अवजारे दिली गेली. या अर्जावर कोणत्याही कृषी अधिकाऱ्याची मंजुरी नसल्याकडे मुंडे यांनी लक्ष वेधले.
ज्या शेतकरी बचत गटांची नोंदणी नाही, त्यांना पाईप खरेदीसाठी अनुदान दिले गेले. ज्या शेतकऱ्यांकडे विहीर आणि वीज कनेक्शन नाही, त्यांना विद्युत पंपांचे वाटप केले गेले. राष्ट्रीय फलोत्पादन अभियानातही अनुदान देताना अनियमितता झाली आहे. त्यामुळे या सर्व घोटाळ्याची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी मुंडे यांनी केली होती.
कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी मुंडेंच्या प्रत्येक आरोपाचे पुराव्यानिशी खंडन केले. मे २0१३ मध्ये आघाडी सरकारच्या काळात कोरडवाहू शेती अभियान योजनेसाठी मरळनाथपूरची निवड झाली. त्यावेळी १ कोटी ८0 लाखांचा प्रकल्प आराखडा होता. प्रत्यक्षात मात्र ४८ लाखांचा निधी प्राप्त झाला, याकडे खोत यांनी लक्ष वेधले. जे आरोप विरोधकांनी केले, ते माहिती अधिकाराचा चुकीचा वापर करणाºया कार्यकर्त्यांकडून अपुरी माहिती दिल्यामुळेच केले गेले, असा टोला त्यांनी मारला.
संदीप खोत ज्या मरळनाथ विकास संस्थेचे सचिव आहेत, त्या धर्मादाय नोंदणी असणाऱ्या संस्थेला या योजनेतील अवजारांचा लाभ दिला गेला आहे. संस्थेकडे स्वत:च्या मालकीचा ट्रॅक्टर आहे. त्याची कागदपत्रे खोत यांनी सभागृहात दाखवली. सुनील खोत यांना व्यक्तिगतरित्या फक्त ७५ हजार रुपयांचा लाभ मिळाला आहे. मरळनाथ शेतकरी स्वयंसाहाय्यता बचत गटाची धर्मादाय नोंदणी आहे. या गटाच्या सदस्यांनी २0१४ लाच प्रतिज्ञापत्र दिल्याचे पुरावे मंत्री खोत यांनी दाखवले.
विरोधी सदस्यांनी माहिती घ्यायला हवी..!
मागणी अर्जांवर कृषी अधिकाºयांची मंजुरी नाही, हा मुंडे यांचा आरोप फेटाळून लावत खोत यांनी, लाभार्थी निवड यादी ग्रामसभेत संमत केली जाते. सभेच्या मान्यतेनंतरच हा लाभ दिला जातो. शेतकºयांनी महाराष्ट्र कृषी उद्योग विकास मंडळाकडूनच अवजारांची खरेदी केली आहे. आमदार शिवाजीराव नाईक, तत्कालीन जि. प. सदस्य सम्राट महाडिक यांच्याहस्ते या अवजारांचे जाहीरपणे वाटप केले आहे. ग्रामीण भागात शेतकरी सामाईक पध्दतीने विहीर खुदाई करतात आणि त्याच्यावर एकाच शेतकºयाच्या नावाने वीज कनेक्शन घेतात, याची माहिती विरोधी सदस्यांनी घ्यायला हवी होती, असा टोला खोत यांनी मारला.