सांगलीत २३ जानेवारीला मराठा समाजाचा आक्रोश मोर्चा
By अशोक डोंबाळे | Updated: January 14, 2025 15:44 IST2025-01-14T15:43:02+5:302025-01-14T15:44:33+5:30
सोनावणे, धस, क्षीरसागर होणार मोर्चात सहभागी

सांगलीत २३ जानेवारीला मराठा समाजाचा आक्रोश मोर्चा
सांगली : मस्साजोग (जि. बीड) येथील सरपंच स्वर्गीय संतोष देशमुख व परभणीचे सोमनाथ सूर्यवंशी यांच्या खुनाच्या निषेधार्थ दि. २३ जानेवारी रोजी सांगलीत आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चात जिल्ह्यातील सर्व बहुजन समाज बांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन मराठा समाजातर्फे केले आहे.
मोर्चा काढण्यासाठीच्या नियोजनासाठी सांगलीत मंगळवारी मराठा समाज भवन येथे बैठक झाली. या बैठकीला अखिल भारतीय मराठा महासंघाचे पश्चिम महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष विलास देसाई, मराठा क्रांती मोर्चाचे डॉ. संजय पाटील, अभिजीत पाटील, दिग्विजय पाटील, तानाजी चव्हाण, विजय धुमाळ, तानाजी भोसले, दादासाहेब पाटील, मच्छिंद्र बाबर, संभाजी पाटील, आदींसह समाज बांधव मोठ्या संख्येन उपस्थित होते.
या बैठकीमध्ये सांगलीत दि. २३ जानेवारीला मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला. या मोर्चास आक्रोश मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला. या आक्रोश मोर्चास स्वर्गीय संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख, कन्या वैभवी देशमुख व त्यांचे कुटुंबीय, खासदार बजरंग सोनावणे, आमदार सुरेश धस, आमदार संदीप क्षीरसागर हे मोर्चामध्ये सहभागी होऊन उपस्थितांना संबोधित करणार आहेत. या मोर्चात सर्व समाजातील समाज बांधवांना मोठ्या संख्येने सहभागी करून घेण्याचा निर्णयही बैठकीत घेण्यात आला.
या आक्रोश मोर्चाच्या नियोजिनासाठी दि. १७ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता सांगलीत मराठा समाज येथे सर्व बहुजन समाजातील बांधवांची बैठक घेण्यात येणार आहे. या बैठकीला जिल्ह्यातील सर्व सामाजिक संस्था, संघटना, सर्व समाजाच्या संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन मराठा समाजातर्फे करण्यात आले आहे.
सोनावणे, धस, क्षीरसागर होणार मोर्चात सहभागी
आक्रोश मोर्चास स्वर्गीय संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख, कन्या वैभवी देशमुख व त्यांचे कुटुंबीय, खासदार बजरंग सोनावणे, आमदार सुरेश धस, आमदार संदीप क्षीरसागर आदी प्रमुख मोर्चामध्ये सहभागी होऊन उपस्थितांना संबोधित करणार आहेत.