जिल्ह्यात मराठा क्रांतीचा पुन्हा एल्गार

By admin | Published: February 1, 2017 12:03 AM2017-02-01T00:03:29+5:302017-02-01T00:03:29+5:30

आंदोलन शांततेत : सांगली, कुपवाडला ६५ आंदोलक ताब्यात, ठिकठिकाणी शासनाचा निषेध

Maratha Kranti again Elgar in the district | जिल्ह्यात मराठा क्रांतीचा पुन्हा एल्गार

जिल्ह्यात मराठा क्रांतीचा पुन्हा एल्गार

Next



सांगली : मराठा क्रांती मोर्चातर्फे मंगळवारी सांगली-माधवनगर रस्त्यावरील वसंतदादा साखर कारखान्यासमोर व कुपवाड रस्त्यावरील सूतगिरणी येथे ‘चक्का जाम’ आंदोलन करण्यात आले. या दोन्ही आंदोलनात संजयनगर व कुपवाड पोलिसांनी अनुक्रमे ३० व ३५ असे एकूण ६५ कार्यकर्ते ताब्यात घेतले. त्यांची लगेच सुटकाही करण्यात आली. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सकाळी सातपासूनच पोलिसांचा बंदोबस्त शहरातील प्रमुख चौकात तैनात झाला होता.
साखर कारखान्यावर मराठा क्रांती मोर्चाचे प्रशांत भोसले यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन झाले. या मार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. भोसले यांच्यासह शिवसेनेचे बजरंग पाटील, नगरसेवक उमेश पाटील, गौतम पाटील, अक्षय पाटील आदी सहभागी झाले होते. ३० कार्यकर्त्यांना संजयनगर पोलिसांनी ताब्यात घेतले. (प्रतिनिधी)
जिल्ह्यातील ३९ ठिकाणी चक्का जाम
जिल्ह्यात एकूण ३९ ठिकाणी आंदोलन झाले. यामध्ये मिरज तालुक्यात सांगली-आष्टा रस्त्यावर लक्ष्मी फाटा, अंकली फाटा, सांगली-माधवनगर रस्त्यावर वसंतदादा साखर कारखाना, म्हैसाळ उड्डाण पूल, कवठेमहांकाळ तालुक्यात लांडगेवाडी फाटा, खरशिंग फाटा, नागज फाटा. जत तालुक्यात वळसंग, जत बसस्थानक, उमदी बसस्थानक. आटपाडी तालुक्यात नेलकरंजी फाटा, सांगोला चौक, आटपाडी, दिघंची बसस्थानक चौक, साठे चौक, साई मंदिर नाका चौक. .
औदुंबरला बसची काच फोडली
भिलवडी : मराठा क्रांती मोर्चातर्फे पलूस तालुक्यातील भिलवडी, वसगडे, औदुंबर फाटा येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. औदुंबर फाटा येथे अज्ञाताने दगड मारून एसटीची काच फोडली. भिलवडी व वसगडे गावातील प्रमुख रस्त्यावर मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी चक्का जाम आंदोलन केले. पंधरा मिनिटातच राष्ट्रगीताने आंदोलनाची सांगता झाली. आंदोलनावेळी आलेल्या रुग्णवाहिकेला रस्ता करून देण्यात आला. शांततेत आंदोलन सुरू असतानाच काही आंदोलकांनी उभ्या असलेल्या बसवर (क्र. एमएच १२, सीएच ७७९७) दगडफेक केली. भिलवडी पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक सुनील हारुगडे यांनी तात्काळ भेट देऊन आंदोलन थांबवून वाहतूक सुरळीत केली.
आटपाडी, दिघंचीत रास्ता रोको
आटपाडी : मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने मंगळवारी आटपाडी आणि दिघंचीत रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. येथील साई मंदिर चौकात जि. प. चे माजी अध्यक्ष अमरसिंह देशमुख यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. सकाळी ११ वाजता साई मंदिर चौकात आंदोलकांनी शांततेने रस्त्यावर ठाण मांडून रास्ता रोको आंदोलन केले. आंदोलकांनी मोठमोठ्याने घोषणा देऊन परिसर दणाणून सोडला. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व वाहने आंदोलकांनी रोखून धरली. अमरसिंह देशमुख यांची पोलिस निरीक्षक कल्लाप्पा पुजारी यांनी समजूत काढली. तहसीलदार अजितसिंह पाटील यांनीही आंदोलनस्थळी येऊन, आंदोलन स्थगित करावे यासाठी प्रयत्न केले. सुमारे अर्ध्या तासानंतर राष्ट्रगीत म्हणून आंदोलकांनी आंदोलन स्थगित केले. आंदोलनात विनायकराव पाटील, ऋषिकेश देशमुख, हर्षवर्धन देशमुख, जितेंद्र गिड्डे, अ‍ॅड. चेतन जाधव, वसंतराव पाटील, डी. एम. पाटील, डी. टी. पाटील, उत्तम पाटील, विलास नांगरे आदींनी सहभाग घेतला. दिघंची बसस्थानक चौकातही आंदोलन करण्यात आले. यावेळी बापूसाहेब गिड्डे, हणमंतराव देशमुख, गणेश माने, अतुल जाधव, विकास मोटे, अमोल काटकर, जितेंद्र मोरे, बाळासाहेब मोटे, सागर ढोले, नीलेश गिड्डे, अक्षय शिरकांडे, अनिल मोरे, सोपान काळे, अ‍ॅड. विलासराव देशमुख, अशोक देशमुख, युवराज मोरे, यश मोरे यांच्यासह समाजबांधवांनी आंदोलनात सहभाग घेतला.
कडेगावात विटा-कऱ्हाड रस्त्यावर वाहतूक ठप्प
कडेगाव : मराठा क्रांती मोर्चा समिती आणि मराठा बांधवांच्यावतीने कडेगाव येथे चक्का जाम आंदोलन करण्यात आले. आंदोलनामुळे कऱ्हाड-विटा रस्त्यावरील वाहतुकीची मोठी कोंडी झाली होती. यावेळी पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवला होता. यावेळी दादासाहेब यादव, नेताजीराव यादव, राजाराम गरूड, अजित करांडे यांनी मनोगत व्यक्त केले. संयोजन समितीच्यावतीने मराठा समाजाच्या विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदार अर्चना शेटे यांना देण्यात आले. अ‍ॅड. प्रमोद पाटील, रामचंद्र कणसे, सुनील मोहिते, समरजित गायकवाड, अभिजित महाडिक, विक्रम महाडिक, धनंजय देशमुख, भारत सूर्यवंशी, सागर सूर्यवंशी, विकी थोरात, शाहीर यादव, राजाभाऊ यादव, अभिजित यादव उपस्थित होते

Web Title: Maratha Kranti again Elgar in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.