Maratha Kranti Morcha : मुख्यमंत्र्यांना सांगलीत प्रवेशबंदी, महापालिका क्षेत्रात गनिमी काव्याने निदर्शने करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2018 02:42 PM2018-07-28T14:42:08+5:302018-07-28T14:52:12+5:30
मराठा आरक्षणाच्या मागणीकडे राज्य सरकारने पूर्णपणे दुर्लक्ष केल्याने राज्यभर असंतोष पसरला आहे. या पार्श्वभूमीवर महापालिका निवडणूकीच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सोमवार दि. ३० सांगलीत येणार आहेत. मात्र, त्यांना कोणत्याही परिस्थितीत सांगलीत येऊ न देण्याचा इशारा मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी शनिवारी पत्रकारांशी बोलताना दिला.
सांगली : मराठा आरक्षणाच्या मागणीकडे राज्य सरकारने पूर्णपणे दुर्लक्ष केल्याने राज्यभर असंतोष पसरला आहे. या पार्श्वभूमीवर महापालिका निवडणूकीच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सोमवार दि. ३० सांगलीत येणार आहेत. मात्र, त्यांना कोणत्याही परिस्थितीत सांगलीत येऊ न देण्याचा इशारा मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी शनिवारी पत्रकारांशी बोलताना दिला.
दरम्यान , इस्लामपूर-सांगली रस्त्यावर आज सकाळी ८ वाजता अहीरवाडी ता. वाळवा फाट्यावर टायर पेटवून, काचेच्या बाटल्या फोडून रस्ता रोको करण्यात आले. इस्लामपूर येथे सकल मराठा समाजाच्या धरणे आंदोलनाला सुरुवात केली.
सोमवारी मुख्यमंत्र्यांना प्रवेशबंदीबरोबरच संपूर्ण जिल्हा बंद व महापालिका क्षेत्रात गनिमी काव्याने निदर्शने करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. मराठा क्रांती मोर्चाचे डॉ. संजय पाटील, सतीश साखळकर, राहूल पाटील यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी आपली भूमिका विशद केली.
मराठा समाजाच्या आरक्षणासाठी राज्यभर आंदोलन सुरू असूनही त्याकडे सरकार लक्ष देत नाही. या पार्श्वभूमीवर महापालिका निवडणूकीच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री फडणवीस सोमवारी सांगलीत येणार आहेत. मराठा समाजाच्या आरक्षणाचा अध्यादेश घेऊन जर मुख्यमंत्री सांगलीत आलेतर त्यांचे मराठा क्रांती मोर्चातर्फे स्वागत करण्यात येईल.
मात्र, केवळ प्रचारासाठी मुख्यमंत्री आले तर त्यांना सांगलीत येऊ दिले जाणार नाही. सोमवारी जिल्हाभर बंद पाळण्यात येणार असून महापालिका क्षेत्रातील आचारसंहिता लक्षात घेता बंद न पाळता जोरदार निदर्शने करण्यात येणार असल्याचेही संयोजकांनी सांगितले.