सांगलीत उद्या ‘मराठा क्रांती मोर्चा’चे वादळ घोंघावणार; जाणून घ्या आचारसंहिता

By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2023 05:43 PM2023-09-16T17:43:16+5:302023-09-16T17:44:33+5:30

मोर्चाची तयारी पूर्ण; जिल्हाभर बैठका, प्रशासनाकडूनही नियोजन

Maratha Kranti Morcha tomorrow in Sangli for reservation for Maratha community and other demands | सांगलीत उद्या ‘मराठा क्रांती मोर्चा’चे वादळ घोंघावणार; जाणून घ्या आचारसंहिता

संग्रहित छाया

googlenewsNext

सांगली : मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासह इतर मागण्यांसाठी रविवारी सांगलीतमराठा क्रांती मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील प्रत्येक भागातून या मोर्चामध्ये मराठा बांधव मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या या माेर्चात लाखो बांधव सहभागी होतील, असा दावा संयोजकांनी केला.

रविवारी सांगलीत मराठा क्रांती मोर्चा होणार असल्याने तयारीला वेग आला आहे. त्यानुसार संपूर्ण जिल्हाभरातून येणाऱ्यांसाठी सुलभ पार्किंगची सोय करण्यात आली आहे. यासाठी आज मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी मोर्चा मार्गावर पाहणी केली. विश्रामबाग येथील क्रांतीसिंह नाना पाटील चौक ते राम मंदिर चौक या परिसरात सर्वत्र ध्वनीिक्षेपकांसह इतर सुविधा केल्या जात आहेत. यातील कामे आता पूर्ण होत आली आहे.

मराठा क्रांती मोर्चाला विविध स्तरांतून पाठिंबाही वाढत असून, संघटनांचे प्रतिनिधी प्रत्यक्ष भेटून सक्रिय सहभाग घेत आहेत.

शुक्रवारी पदाधिकाऱ्यांनी नियोजनाबाबत पत्रकारांशी संवाद साधला. या वेळी पद्माकर जगदाळे, महेश खराडे, डॉ. संजय पाटील, सतीश साखळकर, नितीन चव्हाण, मयूर पाटील, प्रशांत पवार, जयंत जाधव यांच्यासह समाजबांधव उपस्थित होते.

या ठिकाणी पार्किंगची सोय

  • इस्लामपूर, शिराळा, वाळवा, आष्टाकडून येणाऱ्यांसाठी जुना बुधगाव रस्त्यावरील इदगाह मैदान, छत्रपती शिवाजी क्रीडांगण, डॉ. बाबासाहेब आंबेडकर क्रीडांगण याठिकाणी सोय असेल.
  • तासगाव, पलूस, आटपाडी, विटा येथून येणाऱ्यांसाठी तात्यासाहेब मळा, लक्ष्मी मंदिर ते चिन्मय पार्क, मार्केट यार्ड परिसरात सोय असेल.
  • जत, कवठेमहांकाळ, मिरजकडून येणाऱ्या आंदोलकांसाठी आयटी पार्क, कांतीलाल शहा प्रशाला, चिंतामणी कॉलेज मैदान, वालचंद महाविद्यालय, भोकरे कॉलेज या ठिकाणी पार्किंगची सोय करण्यात आली आहे.
  • जयसिंगपूर, कोल्हापूरकडून येणाऱ्यांसाठी राजमती शाळा मैदान, कल्पद्रूम मैदान, शंभर फुटी रस्ता परिसरात पार्किंग असेल.


या मार्गावरून जाईल मोर्चा

विश्रामबाग येथील क्रांतीसिंह नाना पाटील चौकापासून सकाळी दहा वाजता मोर्चाला जिजाऊ वंदना करून सुरूवात होईल. या वेळी क्रांतीसिंहाच्या पुतळ्याला स्वातंत्र्यसैनिक माधवराव माने यांच्याहस्ते पुष्पहार अपर्ण करण्यात येईल. यानंतर मोर्चा गेस्ट हाऊस, मार्केट यार्ड, कर्मवीर चौक मार्गे राममंदिर चौकात पोहोचणार आहे. या ठिकाणी केवळ चार तरुणांची मनोगते व्यक्त होतील.

रुग्णवाहिकेसह इतर सुविधा

मोर्चा सुरू असला तरी अत्यावश्यक सेवेवर परिणाम होणार नाही. मोर्चा कालावधीत सेवा रस्त्यांवरून रुग्णवाहिकांची सोय करण्यात आली आहे. संपूर्ण मोर्चा मार्गावर आंदोलकांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली आहे. अनेक सेवाभावी संघटनांकडून अल्पोपहाराचीही सोय करण्यात आली आहे. उन्हाची तीव्रता लक्षात घेता आजारी असलेल्या व्यक्तींनी काळजी घेण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.

ही आहे मोर्चाची आचारसंहिता

  • मोर्चात स्वयंशिस्त पाळून स्वयंसेवक व पोलिसांना सहकार्य करावे.
  • मोर्चात कोणत्याही जातीधर्माविरोधात घोषणा देऊ नयेत, कोणी देणारही नाहीत याकडे लक्ष द्यावे.
  • मोर्चावेळी धक्काबुक्की न करता, गोंधळ न करता सहभागी व्हावे.
  • कोणत्याही प्रकारचे व्यसन न करता मोर्चात सहभागी व्हावे.
  • मोर्चाला येताना कुणीही हुल्लडबाजी करू नये, अधिक वेगाने वाहने चालवू नयेत.
  • मोर्चात सहभागी होताना मौल्यवान वस्तू, दागिने आणू नयेत. लहान मुलांची काळजी घ्यावी.

Web Title: Maratha Kranti Morcha tomorrow in Sangli for reservation for Maratha community and other demands

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.