कोरेगाव-भीमा दंगलीत मराठा संघटना : रामदास आठवले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2018 01:59 AM2018-02-25T01:59:37+5:302018-02-25T01:59:37+5:30
सांगली : कोरेगाव-भीमा येथील दंगल मराठा समाजातील काही संघटनांनीच भडकवली, असा गौप्यस्फोट केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी शनिवारी सांगलीत पत्रकार परिषदेत केला.
सांगली : कोरेगाव-भीमा येथील दंगल मराठा समाजातील काही संघटनांनीच भडकवली, असा गौप्यस्फोट केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी शनिवारी सांगलीत पत्रकार परिषदेत केला. या दंगलीची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई केली पाहिजे, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
ते म्हणाले की, पुणे जिल्ह्यातील भीमा-कोरेगाव ते पेरणे फाट्यादरम्यान अज्ञातांकडून वाहनांवर दगडफेक करण्यात आली. या दगडफेकीत चाळीसवर वाहनांचे नुकसान झाले. या परिस्थितीमुळे महामार्गालगतची गावे बंद ठेवण्यात आली होती. दगडफेकीनंतर परिसरात तणावाचे वातावरण होते. या दंगलीतून मराठा आणि दलित समाजातील दरी वाढवून आपली पोळी भाजून घेण्याचा काही संघटनांचा हेतू होता. परिस्थिती लक्षात घेतल्यास या दंगलीमागे काही मराठा समाजातील संघटनांचाच हात होता, असे दिसत आहे. हे जरी खरे असले तरी, दंगलीनंतर दि. २ आणि ३ जानेवारीला मराठा आणि दलित समाजातील वाद संपविण्यासाठीही मराठा समाजातील काही सामाजिक काम करणाºया पदाधिकारी आणि पोलिसांनीच मध्यस्थी केली. यामुळे दोन्ही समाजातील वाद निवळला आहे.
महाराष्ट्राच्या भल्यासाठी मराठा-दलित वाद परवडणार नसल्यामुळे दोन्ही समाजांनी गुण्यागोविंदाने एकत्रित राहिले पाहिजे. दंगलीची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा करणार आहे.3
प्रकाश आंबेडकर तमाशातील राजा
कोरेगाव-भीमा दंगलीमध्ये दलित समाजावर अन्याय झाला. या संतापातूनच समाज रस्त्यावर उतरला होता. मी मंत्री असल्यामुळे महाराष्ट्र बंदची हाक देऊ शकत नव्हतो. याचा गैरफायदा घेऊन प्रकाश आंबेडकर यांनी लगेच बंदची हाक दिली. राज्यभरातून त्याला चांगला प्रतिसादही मिळाला. प्रकाश आंबेडकर तमाशातील राजा झाल्याप्रमाणे वागत होते. एका दिवसात राजा होत नाही. समाजाने केलेल्या आंदोलनाचे श्रेय घेणे चुकीचे आहे. या आंदोलनात बहुतांशी माझेच कार्यकर्ते होते, असे रामदास आठवले यांनी स्पष्ट केले.
उध्दव ठाकरे यांची नाराजी नरेंद्र मोदी, अमित शहापर्यंत पोहोचविली
केंद्र आणि राज्यात २०१९ मध्ये होणाºया निवडणुकीमध्ये शिवसेना-भाजपची युती कायम राहणार आहे. मित्रपक्षांना बरोबर घेतल्याशिवाय सत्ता टिकविता येत नाही. शिवसेनेला केंद्रात आणखी एक कॅबिनेट मंत्रीपद देण्याची गरज असतानाही भाजपने त्याकडे दुर्लक्ष केले आहे. शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांची ही नाराजी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्यापर्यंत पोहोचविली आहे. ते महिन्याभरात ठाकरे यांची नाराजी दूर करून भविष्यात भाजपबरोबर युती ठेवण्यासाठी प्रयत्न करतील. माझा त्यासाठी प्रयत्न सुरू आहे, असे आठवले यांनी संगितले.
नीरव मोदीच्या मुसक्या आवळणार
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी पंजाब नॅशनल बँकेचा घोटाळेबहाद्दर उद्योगपती नीरव मोदी याचा काहीएक संबंध नाही. नीरव मोदीच्या मुसक्या आवळून आम्ही बँकेतील घोटाळ्यामधील सर्व पैसे वसूल करणार आहे. भ्रष्टाचारी मंडळींना आमचे सरकार कधीच पाठीशी घालत नाही. बँकांनीही बड्या कर्जदारांना कर्जपुरवठा करताना काही आचारसंहिता घालून घेतल्या पाहिजेत. यासाठी केंद्र सरकार प्रयत्न करीत आहे. बड्यांना बँका लगेच कर्ज देतात आणि छोट्यांना कर्जपुरवठा करीत नसल्याबद्दलही रामदास आठवले यांनी नाराजी व्यक्त केली.