सांगलीतील मुचंडी येथे मराठा आंदोलकांनी कर्नाटकची एसटी फोडली
By संतोष भिसे | Published: October 31, 2023 04:21 PM2023-10-31T16:21:07+5:302023-10-31T16:22:18+5:30
जत परिसरात मराठा आरक्षण आंदोलनाला हिंसक वळण लागले
दरीबडची : गुहागर-विजापूर राष्ट्रीय महामार्गावर मुचंडी (ता. जत) येथील लिंग धाब्याजवळ मराठा आंदोलकानी कर्नाटक महामंडळाच्या सातारा-विजापूर बसची तोडफोड केली. यामध्ये काही प्रवासी किरकोळ जखमी झाले. ही घटना मंगळवारी दुपारी साडेबारा वाजता घडली. यामुळे जत परिसरात मराठा आरक्षण आंदोलनाला हिंसक वळण लागले आहे.
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे -पाटील यांच्या उपोषणाला पाठिंब्यासाठी जतमध्ये कडक बंद पाळण्यात आला. जत एसटी आगारातील सर्व फेऱ्या बंद ठेवण्यात आल्या आहेत. मंगळवारी दुपारी इंडी आगाराची बस (क्रमांक केए २८ एफ २३२९) ही सातारा-विजापूर मार्गावर धावत होती. आंदोलकांनी जतपासून १२ किलोमीटर अंतरावरील लिंग ढाब्याजवळ अडविली. बससेवा बंद असताना गाडी का सोडली म्हणून बसची तोडफोड केली. चालकाच्या दर्शनी भागातील, तसेच खिडकीच्या काचा फोडल्या. सर्व आंदोलक दुचाकीवरुन आले होते.
गाडीत ५५ प्रवासी होते. गाडीची तोडफोड सुरु होताच त्यांच्यात घबराट निर्माण झाली. दगडफेकीत काही प्रवासी किरकोळ जखमीही झाले. या तोडफोडीबाबत ग्रामस्थांनी जत पोलिसांना माहिती दिली. पोलिस येईपर्यंत बस रस्त्याकडेला थांबवून ठेवण्यात आली. प्रवाशांना अन्य खासगी वाहनाने पुढे पाठविण्यात आले.