मराठा आरक्षण; वैधानिक बाबी पूर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2018 11:43 PM2018-04-08T23:43:18+5:302018-04-08T23:43:18+5:30
सांगली/कडेगाव : मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर २०१४ च्या निवडणुकीपूर्वी आघाडी शासनाने निवडणूक डोळ्यासमोर ठेवून घाईघाईने निर्णय घेतला, तो कोर्टात टिकला नाही. आता सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणाचा निर्णय होईल. यासाठी आवश्यक त्या सर्व वैधानिक बाबींची शासनाने पूर्तता केली आहे.
९ आॅगस्ट रोजी मुंबईत झालेल्या मराठा क्रांती मोर्चातील बहुतांशी मागण्या पूर्ण केल्या आहेत, अशी माहिती सहकार व पणनमंत्री सुभाष देशमुख यांनी रविवारी पत्रकारांशी बोलताना दिलीे.
यंदा उसाचे उत्पादन वाढले असून, पुढीलवर्षीही हीच स्थिती कायम राहण्याची शक्यता आहे. याचा साखर उद्योगावर परिणाम होऊ नये, यासाठी उपाययोजना करण्यात येणार आहेत. साखर निर्यातीला अनुदान मिळावे या मागणीसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्याचे शिष्टमंडळ प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहे. उसाच्या रसापासून इथेनॉल निर्मितीसाठी प्रयत्न केले जाणार आहेत. त्याचबरोबर ग्राहकांसाठीची साखर व उद्योगासाठीची साखर यांच्या दरात मोठी तफावत आहे. साखरेचे दर कमी झाले म्हणून बिस्किटांचे, मिठाईचे दर कमी झाल्याचे कधी ऐकीवात नाही. त्यामुळे साखरेचे दर घरगुती ग्राहकांसाठी वेगळे आणि उद्योगासाठी वेगळे ठेवण्याचे धोरण राबविण्याचा आग्रह केंद्र सरकारकडे धरणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
दोन्ही राज्यांचे शिष्टमंडळ भेटणार
सहकारमंत्री देशमुख म्हणाले की, देशात महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशमध्ये सर्वाधिक ऊस उत्पादन होत असते. त्यामुळे निर्यातीमधील तोटा भरून काढण्यासाठी फडणवीस व उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळ लवकरच मोदी यांना भेटणार आहे.
पोटनिवडणुकीबाबत चर्चा नाही!
कडेगाव -पलूस मतदारसंघाचे आमदार, माजी मंत्री डॉ. पतंगराव कदम यांच्या निधनाने झालेल्या दु:खाचे सावट अद्याप कायम आहे.
या मतदारसंघात पोटनिवडणूक होणार आहे; मात्र निवडणूक लढविण्यासंदर्भात भाजपच्या वरिष्ठ पातळीवर कोणतीही चर्चा झालेली नाही, असे सुभाष देशमुख यांनी कडेगाव येथे सांगितले.