सांगलीत उद्या मराठा क्रांती मोर्चा

By admin | Published: September 25, 2016 11:49 PM2016-09-25T23:49:01+5:302016-09-25T23:49:01+5:30

जय्यत तयारी : प्रशासकीय यंत्रणा सज्ज

Maratha Revolution Maratha Revolution Maratha Kranti Front | सांगलीत उद्या मराठा क्रांती मोर्चा

सांगलीत उद्या मराठा क्रांती मोर्चा

Next

सांगली : कोपर्डी येथील बलात्काराच्या घटनेचा निषेध, तसेच विविध मागण्यांसाठी मंगळवारी, २७ सप्टेंबरला सांगलीत मराठा क्रांती मोर्चाचे आयोजन केले आहे. या ऐतिहासिक मोर्चाच्या तयारीला वेग आला असून, महापालिका व पोलिस प्रशासनाने यासाठीची सर्व तयारी पूर्ण केली आहे.
गेला महिनाभर या मोर्चाची तयारी सुरू आहे. शनिवारी मोर्चाचा मार्ग तसेच पार्किंग व्यवस्था जिल्हा पोलिसप्रमुखांनी निश्चित केल्यानंतर तयारीला अधिकच वेग प्राप्त झाला आहे. मोर्चाच्या प्रमुख मार्गावरील ध्वनियंत्रणा फलक, झेंडे, स्वयंसेवकांची जागा, पाणी व अन्य सुविधांची व्यवस्था याबाबतचे नियोजन रविवारी करण्यात आले. मोर्चाची सुरुवात विश्रामबाग येथील क्रांतिसिंह नाना पाटील चौकातून होणार असून, राम मंदिर चौकात समारोप होणार आहे. सध्या या मार्गावरील स्वच्छता, दिवाबत्तीची सोय, या मार्गावरील वाहने, रुग्णवाहिकेचे नियोजन पूर्ण झाले आहे. रविवारी दिवसभर राम मंदिर चौक ते कॉँग्रेस भवन चौक, राम मंदिर चौक ते पुष्पराज चौक या रस्त्यावरील ध्वनिक्षेपक यंत्रणेचे काम पूर्ण करून सायंकाळी याची चाचणी घेण्यात आली.
टोकाचीपरिस्थिती,
निर्णय घ्या : पतंगराव कदम
संपूर्ण राज्यात आता मराठा आरक्षणाच्या मागणीची टोकाची परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे राज्य सरकारला याविषयी सकारात्मक निर्णय घ्यावाच लागेल, असे मत कॉँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार डॉ. पतंगराव कदम यांनी रविवारी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले. ते म्हणाले की, मराठा समाज फार सोशिक आहे. त्यांनी आजवर सर्व गोष्टी सहन केल्या. केवळ शेती हाच त्यांचा उद्योग असल्यामुळे कुटुंबांची संख्या वाढत गेल्यानंतर शेतीचे विभाजन झाले. अल्पभूधारक शेतकरी असलेल्या मराठा समाजासमोर आर्थिक प्रश्न गंभीर बनले आहेत. शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये आरक्षण नसल्याने त्यात भर पडली आहे. या गोष्टींचा आता उद्रेक झाला आहे. कोणताही नेता नसताना शांततेत व शिस्तबद्ध पद्धतीने निघणारे हे मोर्चे गांधीजींच्या अहिंसक क्रांतीचे पुढचे पाऊल आहे. आघाडी सरकारच्या कालावधीत याविषयी नारायण राणे यांच्या अध्यक्षतेखाली समिती नियुक्त केली होती. त्यांनी अहवाल दिल्यानंतर आरक्षणाचा निर्णयसुद्धा झाला, मात्र न्यायालयाने यामध्ये त्रुटी असल्याचे सांगितले होते. आता पुन्हा या त्रुटी दूर करून आरक्षणाचा निर्णय तातडीने घेतला पाहिजे. मराठा आरक्षणाबरोबरच आम्ही मुस्लिम समाजाच्या आरक्षणासाठीही पाठपुरावा करणार आहोत. आरक्षणाच्या प्रश्नावर कोणतीही राजकीय टीका मी करणार नाही. सरकार हे लोकांचे असते, ते कोणत्या पक्षाचे असत नाही. त्यामुळे लोकांच्या प्रश्नांबाबत निर्णय घेणे हे त्यांचे कर्तव्य आहे. आम्ही त्यासाठी योग्य पाठपुरावा करू, असे ते म्हणाले.
रामदास आठवलेंनी निर्णय घ्यावा
मराठा आरक्षणाबाबत निर्णय घेण्याचे केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी ठरविले असेल, तर त्यांनी तातडीने तो घ्यावा. त्यांना त्यासाठीच केंद्रात संबंधित खाते दिलेले आहे, असे कदम म्हणाले.

Web Title: Maratha Revolution Maratha Revolution Maratha Kranti Front

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.