मराठा समाजाचा सांगलीत २७ रोजी मोर्चा
By admin | Published: September 5, 2016 12:09 AM2016-09-05T00:09:38+5:302016-09-05T00:09:38+5:30
एकजुटीचा निर्धार : लाखो समाजबांधव एकत्रित येणार; इतर समाजातील लोकांनाही आवाहन
सांगली : कोपर्डीतील अत्याचाराच्या घटनेचा निषेध आणि मराठा समाजाला आरक्षणासह विविध मागण्यांसाठी मराठा समाजाच्यावतीने येत्या २७ सप्टेंबर रोजी मराठा क्रांती नावाने मोर्चा काढण्यात येणार असल्याची घोषणा रविवारी नियोजन बैठकीत करण्यात आली. या मोर्चाला जिल्ह्यातून लाखो मराठा बांधवांसह इतर समाजातील लोकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन बैठकीत करण्यात आले.
नगर जिल्ह्यातील कोपर्डी येथील विद्यार्थिनीवर झालेल्या अत्याचाराचे पडसाद राज्यभरात उमटले आहेत. अत्याचार करणाऱ्या नराधमाला फाशी द्यावी, मराठा समाजातील नागरिकांवर खोटे आरोप करून त्यांच्यावर जबरीने अॅट्रॉसिटीअन्वये गुन्हे दाखल केले जातात व नंतर त्यांना ब्लॅकमेल केले जाते. इतर समाजाप्रमाणे मराठा समाजाला आरक्षण द्यावे, यासह विविध मागण्यांसाठी मोर्चा काढण्यात येणार आहे. कोपर्डीसारखी घटना पुन्हा घडू नये, मराठा समाजावर अन्याय होऊ नये यासाठी मराठा समाजाने एकत्रित येणे गरजेचे असल्याचे मत मान्यवरांनी बैठकीत व्यक्त केले.
माजी केंद्रीय राज्यमंत्री प्रतीक पाटील म्हणाले की, हा मोर्चा राजकीय पक्षविरहित आहे. मोर्चासाठी नियुक्त कमिटीकडून जी कामे दिली जातील, ती आम्ही पार पाडू. शिवसेनेचे पृथ्वीराज पवार म्हणाले की, इतर समाजावर अन्याय झाल्यावर मराठा समाजाने कधी त्यांना विरोध केला नाही. उलट त्यांच्या पाठीशी राहण्याचे काम केले. मराठा समाज एक होत आहे, हे मराठ्यांनाच कळू द्या. आशा पाटील म्हणाल्या की, कोपर्डीतील घटना पूर्वनियोजित होती. यापूर्वीही इतिहासात मराठ्यांची बदनामी करण्याच्या घटना घडल्या आहेत. त्याचा तरुणांनी अभ्यास करावा. ए. डी. पाटील म्हणाले, मोर्चाच्या नियोजनासाठी कोअर कमिटी स्थापन करावी. सर्व तालुकाध्यक्षांनी पूर्णवेळ काम करून मोर्चा यशस्वी करावा. शरद खराडे म्हणाले, प्रत्येक गावापर्यंत पोहोचण्याचे नियोजन करण्याची गरज आहे.
पद्माकर जगदाळे म्हणाले की, मराठा समाजातील गोरगरीब कार्यकर्त्यांच्या मतावर अनेकांनी पदे भोगली आहे. त्यासाठी मराठा समाजाच्या सर्व राजकीय नेत्यांना मोर्चाला पाठबळ देण्यासाठी भाग पाडावे. वैभव शिंदे म्हणाले की, हा मोर्चा कुठल्या जातीच्या विरोधात नाही. राज्याला धसका बसेल, असा मोर्चा काढला जाईल. मोर्चादिवशी शाळा, महाविद्यालये, शासकीय कार्यालयानांना सुटी द्यावी.
यावेळी डॉ. संजय पाटील, श्रीनिवास पाटील, अरविंद तांबवेकर, तानाजीराव जाधव, महादेव साळुंखे, काका हलवाई, नगरसेवक युवराज बावडेकर, अभिजित भोसले, जिल्हा परिषद सदस्य शिवाजी डोंगरे, राष्ट्रवादीचे राहुल पवार यांच्यासह मराठा समाजातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते (प्रतिनिधी)
युवतींमार्फत निवेदन
बैठकीत मोर्चाचे नियोजन करण्यात आले. मोर्चाच्या अग्रभागी तरुणी, महिला असतील, पाच तरूणी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देतील. मोर्चात सहभागी सर्वजण काळ्या फिती लावतील. मोर्चाच्या नियोजनासाठी कोअर कमिटीची स्थापना करण्यात येणार असून, पुढील बैठक ७ सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आली आहे.
पाच लाखाची देणगी जमा
या बैठकीत मोर्चाच्या नियोजनासाठी अनेकांनी देणगी जाहीर केली. जिल्हा परिषद सदस्य शिवाजी ऊर्फ पप्पू डोंगरे, राष्ट्रवादीचे राहुल पवार यांनी प्रत्येकी एक लाखाची देणगी दिली, तर इतर अनेकांनी १० हजारापासून २५ हजारापर्यंत देणगीची घोषणा केली. एकाचदिवशी तब्बल ५ लाख रुपये देणगीस्वरुपात जमा झाले. काही कार्यकर्त्यांनी स्वत:च्या गावातून मोर्चाला येणाऱ्या आंदोलकांच्या वाहतूक व जेवण, नाष्ट्याची जबाबदारी स्वीकारली.