कवठेमहांकाळ येथे ‘मराठी भाषा गौरव दिन’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2021 04:49 AM2021-02-28T04:49:55+5:302021-02-28T04:49:55+5:30
फोटो ओळ : कवठेमहांकाळ येथील पीव्हीपी महाविद्यालयात ‘मराठी भाषा गौरव दिना’निमित्त आयोजित कार्यक्रमात श्रीनिवास नागे यांचा प्राचार्य डॉ. एम. ...
फोटो ओळ : कवठेमहांकाळ येथील पीव्हीपी महाविद्यालयात ‘मराठी भाषा गौरव दिना’निमित्त आयोजित कार्यक्रमात श्रीनिवास नागे यांचा प्राचार्य डॉ. एम. के. पाटील यांनी सत्कार केला. यावेळी बाळासाहेब शिंदे, डॉ. मोहन लोंढे, प्रा. दिलीप गाडे आदी उपस्थित होते.
कवठेमहांकाळ : येथील पद्मभूषण वसंतरावदादा पाटील महाविद्यालयात भाषा वाङ्मय मंडळातर्फे ‘मराठी भाषा गौरव दिन’ साजरा झाला.
‘लोकमत’च्या सांगली आवृत्तीचे प्रमुख श्रीनिवास नागे प्रमुख पाहुणे होते. प्रभारी प्राचार्य डॉ. एम. के. पाटील अध्यक्षस्थानी होते.
यावेळी नागे म्हणाले की, मराठी भाषेला नवचैतन्य प्राप्त करून देण्यासाठी व तिच्या संवर्धनासाठी दुसऱ्याकडून अपेक्षा करण्यापेक्षा स्वतःपासून सुरुवात करावी. मराठीतून शिक्षण घेतल्याने कोणाचे नुकसान झाले नाही. आज अनेक उच्चपदस्थ व्यक्ती, विचारवंत आदींनी मराठी माध्यमातूनच शिक्षण घेतले आहे. व्यवहारभाषा, व्यवसायभाषा, अभिव्यक्ती भाषा म्हणून वेगवेगळ्या प्रकारे मराठी भाषेचा वापर होत असला, तरी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा अद्याप मिळाला नाही. मराठीचे संवर्धन करण्यासाठी प्रत्येक मराठी व्यक्तीने मराठी बोलावी, लिहावी, वाचावी.
प्राचार्य डॉ. पाटील यांनी मराठी भाषा वाढीसाठी प्रत्येकाने प्रयत्नपूर्वक मराठीचा आग्रह धरण्याचे आवाहन केले.
शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब शिंदे, मराठी विभागप्रमुख डॉ. मोहन लोंढे, सांस्कृतिक विभागप्रमुख प्रा. डॉ. दिलीप गाडे, प्रा. विजय कोष्टी प्रमुख उपस्थित होते.
प्रा. शशिकांत पोरे यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. रवींद्र पाटील यांनी आभार मानले. यावेळी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.