कन्नडबहुल गावांत मराठी शाळा
By admin | Published: May 24, 2017 11:35 PM2017-05-24T23:35:31+5:302017-05-24T23:35:31+5:30
कन्नडबहुल गावांत मराठी शाळा
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : जिल्ह्यातील जत तालुक्याच्या सीमाभागातील कन्नडबहुल भागातील २१ गावांत प्राथमिक मराठी शाळा सुरू करण्याचा ठराव जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या बैठकीत झाला. याबाबत राज्य शासनाकडे तातडीने पाठपुरावा करून, येत्या शैक्षणिक वर्षापासून शाळा सुरू करण्याबाबत राज्य सरकारशी संपर्क साधू, अशी माहिती अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांनी दिली.
कर्नाटकात लोकप्रतिनिधींनी जय महाराष्ट्र अशा घोषणा दिल्याच्या निषेधार्थ जिल्हा परिषदेने कन्नडबहुल भागामध्ये मराठी शाळांचा निर्णय घेतला. जिल्हा परिषद स्थायी समितीची मासिक सभा अध्यक्ष देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. उपाध्यक्ष सुहास बाबर, सभापती प्रा. सुषमा नायकवडी, अरुण राजमाने, तम्मणगौडा रवी, ब्रह्मदेव पडळकर, प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी अजयकुमार माने यांच्यासह खातेप्रमुख उपस्थित होते.
कर्नाटकातील लोकप्रतिनिधींनी सभागृहात ‘जय महाराष्ट्र’ अशा घोषणा दिल्यास संबंधित लोकप्रतिनिधीचे पद रद्द करण्याच्या वादग्रस्त विषयानंतर जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीत हा निर्णय घेण्यात आला. सांगली, कोल्हापूर, ठाणे येथे त्याचे पडसाद उमटले होते. कोल्हापुरात तर शिवसेना कार्यकर्त्यांनी कर्नाटकातील एसटी बसेसवर ‘जय महाराष्ट्र’ असे रंगवले.
जिल्हा परिषदेने कन्नडबहुल भागात आता पुन्हा मराठी माध्यमाच्या शाळा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. सीमाभागात एकवीस शाळा सुरू करण्याबाबतचा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठविला जाणार आहे. पाठपुरावा झाल्यास राज्य शासन काय निर्णय घेते, हे पाहावे लागणार आहे.
खासगी कन्नड शाळांकडून अडवणूक
सांगली जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीतही सीमाभागातील २१ गावांत मराठी शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या काळातही तसा प्रयत्न झाला होता. तेथे मराठी माध्यमाच्या शाळा सुरू करण्यासाठी १०० टक्के अनुदान देण्यात येणार होते. सांगलीसह सोलापूर जिल्ह्यातही तसे प्रस्ताव मागवले. मात्र त्यावर अंतिम निर्णय झाला नाही. त्यात स्थानिक खासगी कन्नड शाळा संस्थाचालक अडवणूक करीत असल्याचे स्पष्ट झाले. कारण या निर्णयामुळे त्यांना गाशा गुंडाळावा लागणार होता. तेथे मराठी शाळांसाठी विद्यार्थी उपलब्ध असतानाही शाळा मात्र सुरू होऊ शकल्या नाहीत.