लग्नाचे मुहूर्त गाठण्यासाठी नेत्यांची मॅरेथॉन , स्टार पाहुण्यांसाठी प्रसंगी मुहूर्तावरही पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2018 10:56 PM2018-05-07T22:56:55+5:302018-05-07T22:56:55+5:30
इस्लामपूर : यंदा मे महिन्यातील ६, ७, ८, ९, १०, ११ व १२ या तारखांनी लग्न मुहूर्ताचा विक्रम मोडीत काढला आहे. ग्रामीण व शहरी भागातील सर्वच कार्यालये वर्ष, सहा महिन्यांपूर्वीच आरक्षित झाली आहेत.
इस्लामपूर : यंदा मे महिन्यातील ६, ७, ८, ९, १०, ११ व १२ या तारखांनी लग्न मुहूर्ताचा विक्रम मोडीत काढला आहे. ग्रामीण व शहरी भागातील सर्वच कार्यालये वर्ष, सहा महिन्यांपूर्वीच आरक्षित झाली आहेत. शुभकार्याला आपल्या नेत्याने हजर रहावे म्हणून यासाठी त्या नेत्याच्या सोयीने मुहूर्त काढले जात आहेत. त्यातून ‘स्टार’ पाहुणा उशिरा आला तर प्रसंगी मुहूर्तावर पाणी सोडले जात आहे. यामुळे नेतेमंडळींना लग्न समारंभास उपस्थिती लावताना तारेवरची कसरत करावी लागत आहे.
२0 ते २५ वर्षांपूर्वी लग्न ठरवताना पै-पाहुणे, नातेसंबंध बघितले जात होते. घरातील वडीलधारी सांगतील त्या मुला-मुलीशी लग्न करण्याची परंपरा होती. आता ती लोप पावली आहे. ‘यादी पे शादीचा’ नवीन फंडा पुढे आला आहे. मुला-मुलींच्या पसंतीशिवाय लग्नाचा विषय पुढे सरकत नाही. पूर्वी मुलीच्या बापाला खर्च करावा लागत होता. आता दोन्ही बाजूच्या मंडळींना खर्चाची बाजू उचलावी लागते.
पूर्वी बोटावर मोजण्याइतकेच पक्ष आणि नेते होते. बहुतांश विवाह समारंभ मुहूर्तावर होत होते. आता राजकीय पक्षांची संख्या वाढल्याने गल्लीपासून दिल्लीपर्यंत नेत्यांची संख्याही वाढली आहे. पूर्वी ठराविक महिन्यात लग्नाचे मुहूर्त असायचे. आता कार्यालय आणि नेत्यांच्या सोयीप्रमाणे बाराही महिने मुहूर्त काढले जात आहेत. पण या नेत्यांना सर्वच समाजातील लग्नांना उपस्थित रहावे लागत असल्याने मुहूर्त गाठताना मॅरेथॉनप्रमाणेच नियोजन करावे लागत आहे.
लोकसभा, विधानसभा निवडणुका वर्षावर येऊन ठेपल्या आहेत. त्यामुळे नेते कार्यकर्ते व सामान्यांना नाराज करत नाहीत. जे जे पत्रिका देतील, त्यांच्या समारंभाला हे नेते उपस्थित राहत आहेत. त्यामुळेच लग्नसमारंभात नेत्यांची रेलचेल दिसत आहे.