वंचित बहूजन आघाडीतर्फे कंत्राटी भरतीविरोधात सांगलीत मोर्चा
By शरद जाधव | Published: September 26, 2023 06:40 PM2023-09-26T18:40:54+5:302023-09-26T18:42:10+5:30
सांगली : देशातील सर्वसामान्य नागरिक सन्मानाने जगला पाहिजे यासाठी प्रयत्न करण्याऐवजी त्याला अडचणीत आणण्याचे केंद्र सरकारकडून निर्णय घेतले जात ...
सांगली : देशातील सर्वसामान्य नागरिक सन्मानाने जगला पाहिजे यासाठी प्रयत्न करण्याऐवजी त्याला अडचणीत आणण्याचे केंद्र सरकारकडून निर्णय घेतले जात आहेत. विकासाच्या नावाखाली विविध संस्थांचे झपाट्याने खासगीकरण करण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून तर देशाची अर्थव्यवस्थाच भांडवलदारांच्या दावणीला बांधण्याचा डाव सुरू असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय युवा नेते सुजात आंबेडकर यांनी बुधवारी सांगलीत केला.
सरकारी नोकरींचे कंत्राटीकरण करण्याच्या शासनाच्या निर्णयाचा निषेध करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाचे नेतृत्व सुजात आंबेडकर यांनी केले. यावेळी आंदोलकांसमोर बोलताना त्यांनी शासनाच्या धोरणावर टिकास्त्र सोडले.
आंबेडकर म्हणाले की, केंद्र सरकारने बीएसएनल, एअर इंडियाचे खासगीकरण करत त्यातील कर्मचाऱ्यांची अडचण केली. आता शासनाच्या नव्या धोरणानुसार वर्ग एक पासून सर्वच पदावर कंत्राटी पध्दतीने नोकरभरती करण्याचा डाव सुरू आहे. त्यातच संपूर्ण सरकारची मालकी असलेल्या रेल्वे, आरोग्य यंत्रणांचेही खासगीकरण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. हा संस्था सरकारच्या मालकीच्या राहिल्या नाहीत तर आरक्षणाला अर्थच उरणार नाही. गोरगरीब घरातील मुलांच्या नोकरीची संधीच यामुळे जाणार असल्याचेही ते म्हणाले.
यावेळी शिवसेना उध्दव ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष संजय विभूते, अभिजित पाटील, वंचितचे जिल्हा प्रभारी संतोष सूर्यवंशी, राज्य उपाध्यक्ष सोमनाथ साळुंखे, युवक आघाडी राज्य उपाध्यक्ष इंद्रजित घाटे, जिल्हाध्यक्ष महावीर कांबळे, राजेश गायगवळे, आनंदसागर पुजारी, अलीसो मुलाणी, क्रांतीताई सावंत यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले हाेते.