बेदाणा, द्राक्ष उत्पादकांच्या अनुदानासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा
By अशोक डोंबाळे | Published: May 17, 2023 05:48 PM2023-05-17T17:48:32+5:302023-05-17T17:49:14+5:30
सांगलीत ‘स्वाभिमानी’चे कार्यकर्ते-पोलिसांत झटापट, संतप्त शेतकर्यांनी वाटला बेदाणा
सांगली : शासनाने द्राक्ष उत्पादकांना एकरी एक लाख आणि बेदाणा उत्पादकांना टनाला लाख रुपयांचे अनुदान द्यावे, या प्रमुख मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली द्राक्ष उत्पादकांनी बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. मोर्चात शेतकऱ्यांनी निषेधाच्या घोषणा दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयात घुसण्याचा प्रयत्न करताना पोलिस आणि आंदोलकांत झटापट झाली. बेदाणा वाटून शेतकऱ्यांनी शासनाचा निषेध केला.
सांगलीतील विश्रामबाग चौकातून स्वाभिमानी पक्षाचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांच्या नेतृत्वाखाली मोर्चाची सुरुवात झाली. शेतकऱ्यांनी बेदाण्याचा हार करून गळ्यात घातले होते. शासनाकडून शेतकरीविरोधी धोरण राबविली जात आहेत, याच्या निषेधाच्या जोरजोरात घोषणा दिल्या जात होत्या. घोषणाबाजी करतच मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयात आला. यावेळी शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील प्रवेशद्वाराचे गट उघडून आता घुसण्याचा प्रयत्न केला. आंदोलक शेतकऱ्यांना पोलिसांनी रोखल्यामुळे पोलिस आणि आंदोलकांत झटापट झाली. अखेर प्रवेशद्वारातच आंदोलकांची सभा झाली. सभेनंतर शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन दिले.
आंदोलकांच्या मागण्या
- सौद्यामध्ये बेदाण्याची होणारी उधळण १०० टक्के बंद करावी.
- बेदाणा बॉक्सचे निम्मे पैसे शासनाने शेतकऱ्यांना द्यावेत.
- बेदाणा विक्रीनंतर पैसे २१ दिवसांत मिळावेत, त्यानंतर दिल्यास दोन टक्के व्याज शेतकऱ्यांना द्यावे.
- कीटकनाशकांच्या किमती कमी कराव्यात, त्यावरील जीएसटी कमी करावा.
- शेतकऱ्यांना कमी दराने मध्यम व दीर्घ मुदतीचा कर्जपुरवठा करावा.
५ जूनपासून पालकमंत्र्यांच्या घरासमोर ठिय्या : महेश खराडे
द्राक्ष आणि बेदाणा उत्पादक शेतकरी दिवसेंदिवस अडचणीत चालला आहे. उत्पादकांना अनुदान देण्याची राज्यस्तरीय मागणी आहे. शेतकर्यांच्या पाठीशी शासनाने उभे राहिले पाहिजे, मात्र त्याबाबत सरकार गंभीर नाही. या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी दि. ५ जूनला चड्डी मोर्चा काढून पालकमंत्र्यांच्या घरासमोर ठिय्या मारण्याचा इशारा जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी दिला.