माथाडी महामंडळाच्या मनमानी कारभाराविरोधात सांगलीत हमालांचा मोर्चा, माहिती लपवली जात असल्याचा आरोप
By अशोक डोंबाळे | Published: October 13, 2023 05:08 PM2023-10-13T17:08:01+5:302023-10-13T17:08:48+5:30
जिल्हाधिकाऱ्यांनी सव्वातीन कोटी देऊनही हमालांना वाटप नाही
सांगली : हमाल माथाडी महामंडळाच्या अधिकाऱ्यांचा मनमानी पद्धतीने कारभार सुरू आहे. हमालांनी मागितलेली कोणतीही माहिती दिली जात नाही, असा आरोप करून हमालांनी सांगली मार्केट यार्डातील माथाडी महामंडळाच्या कार्यालयावर शुक्रवारी मोर्चा काढून निदर्शने केली. दरम्यान, अधिकाऱ्यांनी यापुढे असे होणार नाही, सर्व माहिती दिली जाईल, असे आश्वासन दिल्यानंतर हमालांनी आंदोलन मागे घेतले.
जिल्हा हमाल पंचायतीचे विकास मगदुम, बाळासाहेब बंडगर, राघू बंडगर, संजय मोरे, प्रल्हाद व्हनमाने, बजरंग खुटाळे, किरण रूपनर, आदगोंडा गोंडाजे, खंडू सोनूर, दिगंबर तुपलोंढे, मारुती बंडगर यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढला होता. माथाडी महामंडळातील अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभाराच्या धिक्काराच्या घोषणा दिल्या जात होत्या. तसेच माथाडी महामंडळाकडे १०० कोटींच्या ठेवी आहेत. या ठेवी जी बँक अधिकाऱ्यांना जास्त कमिशन देतात, त्यांच्याकडेच ठेवल्या जात आहेत, असा आरोप बाजार समितीचे माजी संचालक बाळासाहेब बंडगर यांनी केला.
जिल्हाधिकारी यांनी रेशनिंगच्या हमालीची तीन कोटी ३१ लाख रुपयांची लेवी देऊनही त्याचे हमालांना वाटप झाले नाही. हमालांची हमाली व्यापाऱ्यांनी वेळेत भरली नाही तर संबंधीत व्यापाऱ्यास दंड आकारला जात आहे. पण, त्या दंडाच्या रकमेचा कुणालाही हिशेब दाखविला जात नाही, असाही आरोप बंडगर यांनी केला. दि. १६ सप्टेंबर २०२३ रोजी माथाडी मंडळाकडे अर्ज करून हमाल, तोलाईदार, महिला माथाडी कामगारांच्या नोंदणी माथाडी कामगारांच्या फंड, ग्रॅच्युईटी व इतर संबंधीत आर्थिक माहिती मागितली होती. परंतु, अधिकाऱ्यांनी माहिती दिली नाही, असेही बंडगर म्हणाले. म्हणूनच संतप्त झालेल्या हमाल व तोलाइदारांनी माथाडी महामंडळावर मोर्चा काढून अधिकाऱ्यांचा निषेध केला.
दरम्यान, माथाडी महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी हमालांना गरजेची सर्व माहिती देण्यात येईल, असे आश्वासन दिल्यानंतर त्यांनी आंदोलन मागे घेतले.