झेंडूचा दर घसरला; शेतकऱ्यांचे दिवाळे

By admin | Published: October 30, 2016 11:33 PM2016-10-30T23:33:57+5:302016-10-30T23:33:57+5:30

दहा रुपये किलोने विक्री : निराशेचे वातावरण

Marigold rate slips; Farmers' Bust | झेंडूचा दर घसरला; शेतकऱ्यांचे दिवाळे

झेंडूचा दर घसरला; शेतकऱ्यांचे दिवाळे

Next

सांगली/मिरज : दसऱ्यापाठोपाठ दिवाळीतही झेंडूचे दर गडगडल्याने उत्पादक शेतकऱ्यांचे दिवाळे निघाले. अवघ्या दहा रुपये किलोने झेंडूची विक्री करण्याची वेळ उत्पादकांवर आल्याने ऐन सणात डोळ्यात पाणी घेऊन उत्पादक बाजारातून परतले.
फुलांच्या बाजारात आवक मोठी असल्याने गणेशोत्सव व दसऱ्यातही झेंडूचे दर वाढले नाहीत. यावर्षी फुलांचे उत्पादन वाढल्याने दर घटले आहेत. गणेशोत्सव व दसरा, दिवाळीत झेंडूला चांगला दर मिळत असल्याने शेतकरी मोठ्याप्रमाणात झेंडूची लागवड करतात. मात्र यावर्षी गणेशोत्सव, दसरा व आता दिवाळीलाही झेंडूला फक्त १० रूपये दर मिळाल्याने शेतकऱ्यांची मोठी निराशा झाली.
दरवर्षी दिवाळीत ५० रूपये किलोने विक्री होणाऱ्या झेंडूची आज बाजारात २० रूपये किलो दराने विक्री सुरू होती. पावसाने कर्नाटक, व कोकणातही फुलांचे चांगले उत्पादन झाले असल्याने झेंडूच्या मागणीत घट होऊन दर पडल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. फुलांच्या बाजारात निशिगंध व गुलाबाचे दरही वाढले आहेत. निशिगंधाचा दर चारशे रूपयावर, तर गुलाबाचा दर प्रती शेकडा ३०० रूपयावर आहे. मात्र झेंडूने शेतकऱ्यांची चांगलीच निराशा केली आहे. आता झेंडूपासून उत्पन्न मिळविण्यासाठी वर्षभर प्रतीक्षा करावी लागणार आहे.
रविवारी लक्ष्मीपूजनाच्या पार्श्वभूमीवर दिवाळीमध्ये लक्ष्मीपूजनासाठी आवश्यक असणाऱ्या झेंडूची सांगली बाजारपेठेत यंदा विक्रमी आवक झाली. लक्ष्मीपूजन पारंपरिक पध्दतीने सायंकाळी असल्याने दिवसभरात फुलांची चांगली विक्री झाली. दरम्यान, उत्पादकांना अपेक्षेपेक्षा दर कमी मिळाल्याचे सांगत, पाडव्याला अजून समाधानकारक दर मिळावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
लक्ष्मीपूजन आणि घर, दुकाने सजावटीसाठी, तोरणांसाठी दिवाळीत झेंडूला चांगली मागणी असते. लक्ष्मीपूजनाला तर झेंडूच्या फुलांच्या माळा, तोरण करून सजावट करण्यात येत असल्याने लक्ष्मीपूजनाअगोदर दोन दिवसांपासूनच शहरात झेंडू विक्रीसाठी उपलब्ध झाला होता. दसऱ्याला झेंडूची चांगली आवक होऊनही दर कमी मिळाल्याने उत्पादकांनी नाराजी व्यक्त केली होती. तरीही दिवाळीत दर मिळेल, या आशेवर हे शेतकरी होते. दिवाळीचा सणही या शेतकऱ्यांना धक्का देऊन गेला. कवडीमोल दराने झेंडूची विक्री करून शेतकऱ्यांना बाजारपेठेतून परतावे लागले. शहरात हरभट रोड, मारूती रोड, कॉलेज कॉर्नर, राम मंदिर चौक, जुना कुपवाड रोड, विश्रामबाग आदी ठिकाणी झेंडू विक्रेत्यांनी स्टॉल उभारले होते.
गेल्यावर्षी झेंडूला १२० ते १६० रूपये प्रति किलो दर मिळाला होता. यंदा मात्र, बाजारात झेंडू मोठ्या प्रमाणात आल्याने दिवसभरात झेंडूचे दर केवळ १0 ते २0 रूपयांपर्यंत होते. फुलांसोबतच हारांनाही चांगली मागणी असली तरी बहुतांश घरांमध्ये झेंडू फुले विकत आणून घरीच हार, तोरण बनविण्यात येते. पाडव्यालाही झेंडू फुले आवश्यक असल्याने सोमवारी तरी दरात वाढ होईल, अशी अपेक्षा विक्रेत्यांनी व्यक्त केली. (प्रतिनिधी)

Web Title: Marigold rate slips; Farmers' Bust

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.