जत तालुक्यात ‘बाजार समिती’चे वारे

By Admin | Published: July 19, 2015 11:16 PM2015-07-19T23:16:37+5:302015-07-19T23:43:08+5:30

ग्रामपंचायतींची रणधुमाळीही सुरू : इच्छुकांची संख्या वाढली, कार्यकर्ते सांभाळताना नेत्यांची कसरत

Market Committee 'in Jat taluka | जत तालुक्यात ‘बाजार समिती’चे वारे

जत तालुक्यात ‘बाजार समिती’चे वारे

googlenewsNext

जयवंत आदाटे -जत -तालुक्यातील २७ ग्रामपंचायतींसाठी व बाजार समितीसाठी एकाच महिन्यात मतदान होणार आहे. त्यामुळे राजकीय हालचाली गतिमान झाल्या आहेत. बाजार समितीसाठी सर्वच राजकीय पक्षाकडे इच्छुक उमेदवारांची संख्या ३५ ते ४० इतकी आहे. त्यातील फक्त सहा इच्छुकांनाच उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. उर्वरित नाराज कार्यकर्त्यांना शांत करताना नेतेमंडळींना तारेवरची कसरत करावी लागणार आहे.
तालुक्यातील २७ ग्रामपंचायतींसाठी गावपातळीवर प्रचाराची रणधुमाळी सुरु झाली आहे. पक्षीय गट-तट आणि मतभेद बाजूला ठेवून सत्ता संपादन करण्यासाठी वेगवेगळ्या आघाड्या स्थापन करण्यात आल्या आहेत. बाजार समिती निवडणुकीसाठी एकमेकांच्या विरोधात असणारे व जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत एकमेकांवर आरोप करणारे कार्यकर्ते गाव पातळीवर एकत्र येऊन ग्रामपंचायत निवडणूक लढवत आहेत.
ग्रामपंचायतीसाठी आपण सर्वजण एक आहोत, तर बाजार समिती निवडणुकीसाठी आम्ही तुम्हाला अस्मान दाखवितो, असे खासगीत बोलताना कार्यकर्ते चर्चा करत आहेत. त्यामुळे सर्वसामान्य मतदान आणि नागरिकांत संभ्रमावस्था निर्माण होत आहे.
ग्रामपंचायत निवडणुकीसाठी स्थानिक पातळीवर आघाड्या करण्यात आल्या आहेत. त्यामुळे गावपातळीवरील कार्यकर्त्यांना सध्या महत्त्व प्राप्त झाले आहे. या ग्रामपंचायतीपैकी भिवर्गी, शेगाव, उटगी, अंकलगी, तिकोंडी, अंकले या सहा ग्रामपंचायती लोकसंख्येने मोठ्या आहेत. तेथील कामाचा लेखा-जोखा आणि मागील पाच वर्षात केलेले विकास काम उमदेवारांना जनतेसमोर मांडावे लागणार आहे.
याशिवाय पंचायत समिती व जिल्हा परिषद सदस्याने विकास काम करताना गावातील प्रलंबित कामांना प्राधान्यक्रम दिला आहे काय? याचा विचार करुन मतदार मतदान करण्याची शक्यता आहे. ग्रामपंचायत निवडणुकीसाठी सर्वपक्षीय कार्यकर्ते एकत्र येतात. त्यामुळे तालुका पातळीवरील नेतेमंडळी कोणालाही आपला पाठिंबा जाहीरपणे देत नाहीत. जो कोणी निवडून येईल आणि पराभूत होईल तो आपलाच आहे, असे समजून ते शांत बसत आहेत. यामुळे लोकसभा, विधानसभा, जिल्हा परिषद, पंचायत समिती या व इतर निवडणुकांसाठी त्यांना गाव पातळीवरील कार्यकर्त्यांची मनधरणी करावी लागत नाही, यातून त्यांना बेरजेचे राजकारण करता येत नाही.
बाजार समिती निवडणुकीसाठी मिरज व कवठेमहांकाळ तालुक्याच्या मानाने जत तालुक्यात जादा मतदार आहेत. त्यामुळे तालुक्यासाठी सहा किंवा सातजणांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. कोणत्या पक्षाची कोणाबरोबर आघाडी होणार आहे आणि या आघाडीत जिल्हा पातळीवरील कोण नेतेमंडळी असणार आहेत, यासंदर्भात अद्याप चित्र स्पष्ट झाले नाही. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली
आहे.
तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस व जनसुराज्य शक्ती पक्षासोबत चर्चा करूनजे सोबत येणार आहेत, त्यांना बरोबर घेऊ, जर येणार नसतील तर स्वतंत्रपणे स्वबळावर निवडणुका लढविण्याची आमची तयारी आहे, अशी घोषणा आमदार विलासराव जगताप यांनी केली आहे.
सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस व जनसुराज्य शक्ती पक्षाच्या नेतेमंडळींनी आम्हाला सहकार्य केले आहे. बाजार समिती निवडणुकीसाठी सहकार्य करण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे. त्या दृष्टीने आम्ही जागा वाटप करणार आहे, असे जिल्हा बँकेचे संचालक विक्रम सावंत व बाजार समिती माजी सभापती सुरेश शिंदे कार्यकर्त्यांना सांगत आहेत. त्यामुळे जिल्हा बँकेचा पॅटर्न बाजार समिती निवडणुकीसाठी निश्चित झाला आहे, असे इच्छुक उमेदवार व कार्यकर्ते मतदारांना सांगू लागले आहेत.

युतीबाबत संदिग्धता कायम
तालुक्यातील काँग्रेस व भाजपने येथील राष्ट्रवादी काँग्रेस आणि जनसुराज्य शक्ती पक्षासोबत युती होईल, असे भाकित केले आहे.
परंतु जनसुराज्य पक्षाचे येथील नेते बसवराज पाटील व अ‍ॅड. एम. के. पुजारी व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष अ‍ॅड. बी. ए. धोडमणी व रमेश पाटील यांनी आपली भूमिका अद्याप स्पष्ट केली नाही.
त्यांनी सावध भूमिका घेऊन आपल्या पक्षातील कार्यकर्त्यांना जो पक्ष जादा स्थान (उमेदवारी) देईल त्यांना पाठिंबा देऊ, असे खासगीत सांगून दबाव तंत्राचा वापर ते करू लागले आहेत. येत्या २२ किंवा २३ जुलै रोजी यासंदर्भातील चित्र स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

Web Title: Market Committee 'in Jat taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.