राज्यातील बाजारपेठा २७ ऑगस्ट रोजी बंद, पुण्यातील बैठकीमध्ये निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2024 05:45 PM2024-08-08T17:45:31+5:302024-08-08T17:46:22+5:30

१६ ऑगस्टला सांगलीत परिषद

Market Committees Demand Abolition of Tax Markets in the state closed on August 27 | राज्यातील बाजारपेठा २७ ऑगस्ट रोजी बंद, पुण्यातील बैठकीमध्ये निर्णय

संग्रहित छाया

सांगली : अन्नधान्यावर वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) लागू करण्यात आल्याने बाजार समितीकडून आकारण्यात येणारा नियमन कर (सेस) रद्द करण्यात यावा. जीएसटी कायदा सुटसुटीत करण्यात यावा, यासह विविध मागण्यांसाठी राज्यभरातील व्यापाऱ्यांकडून २७ ऑगस्ट रोजी बाजारपेठा बंद ठेवण्यात येणार आहेत, अशी माहिती सांगली चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष अमरसिंह देसाई यांनी दिली.

अमरसिंह देसाई म्हणाले, महाराष्ट्र राज्य व्यापारी कृती समितीकडून राज्य व्यापारी परिषदेचे आयोजन रविवारी मार्केट यार्डातील व्यापार भवन येथे आयोजित केले होते. महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रिज अँड ॲग्रीकल्चर (मुंबई), फेडरेशन ऑफ असोसिएशन ऑफ महाराष्ट्र (मुंबई), चेंबर ऑफ असोसिएशन्स ऑफ महाराष्ट्र इंडस्ट्रिज अँड ट्रेड (मुंबई), दि ग्रेन, राइस अँड ऑइल सीडस् मर्चेंट्स असोसिएशन (मुंबई), दी पुना मर्चंट्स चेंबर (पुणे) या संघटनांचे प्रतिनिधी परिषदेत सहभागी झाले होते. मुंबई, नवी मुंबई, उल्हासनगर, नाशिक, जळगाव, भुसावळ, जुन्नर, नारायणगाव, चाकण, बारामती, अहमदनगर, बार्शी, लातूर, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, कराड, सातारा या जिल्ह्यातील व्यापारी संघटनांचे १५० पदाधिकारी सहभागी झाले होते.

अन्नधान्यावर वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) लागू करण्यात आल्याने बाजार समितीकडून आकारण्यात येणारा नियमन कर (सेस) रद्द करण्यात यावा. जीएसटी कायदा सुटसुटीत करण्यात यावा, लिगल मॅट्रोलॉजी कायदा नियम तीनमध्ये बदल करू नये, यासह विविध मागण्यांचे ठराव परिषदेत संमत करण्यात आले. बाजार आवारातील कर रद्द करण्यासाठी गेल्या काही वर्षांपासून पाठपुरावा करण्यात येत आहे.

मात्र, शासनाकडून व्यापाऱ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले. शासनाचे लक्ष वेधण्यासाठी २७ ऑगस्ट रोजी एक दिवसाचा लाक्षणिक बंद पाळण्यात येणार आहे. यादिवशी राज्यभरातील घाऊक आणि किरकोळ बाजारपेठा बंद ठेवण्यात येणार आहेत. मुंबईत व्यापाऱ्यांकडून आंदोलन करण्यात येणार आहे.

१६ ऑगस्टला सांगलीत परिषद

सातारा, सांगली, पुणे, कोल्हापूर, सोलापूर या पाच जिल्ह्यातील विभागीय परिषद दि. १६ ऑगस्ट रोजी सकाळी १०:०० वाजता सांगलीतील मार्केट यार्डात घेण्यात येणार आहे. या परिषदेमध्ये आंदोलनाची दिशा ठरविण्यात येणार आहे, अशी माहिती अमरसिंह देसाई यांनी दिली.

Web Title: Market Committees Demand Abolition of Tax Markets in the state closed on August 27

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.