तासगावात आरक्षित जागांचा बाजार
By admin | Published: April 19, 2016 11:50 PM2016-04-19T23:50:07+5:302016-04-20T00:33:24+5:30
बेकायदा बांधकामे : निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नगरपालिका कारभाऱ्यांचे कारनामे चव्हाट्यावर
दत्ता पाटील--तासगाव नगरपालिका निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. याच पार्श्वभूमीवर पालिकेतील कारभाऱ्यांचा कारभारही चव्हाट्यावर येत आहे. शहरातील नागरिकांच्या सोयीसाठी आरक्षित ठेवलेल्या जागा नगरसेवकांकडूनच लाटल्या जात असल्याचा भांडाफोड काँग्रेसचे तालुकाध्यक्ष महादेव पाटील यांनी केला. त्यांनी दिलेले उदाहरण नमुने दाखल म्हणावे लागेल. मात्र शहरातील अनेक आरक्षित जागांवर खुलेआमपणे बेकायदा बांधकाम आणि टोलेजंग इमारती उभ्या राहिल्या आहेत.
काही जागा नगरसेवकांनी, तर काही नगरसेवकांच्या बगलबच्च्यांनी बळकावलेल्या आहेत. त्यामुळे पालिकेतील काही कारभाऱ्यांचा कारभार स्वत:चे हित साधण्यापुरताच मर्यादित राहिल्याचे चित्र आहे. जागा बळकावण्याच्या उद्योगाला प्रत्यक्ष- अप्रत्यक्ष नेते आणि सत्ताधाऱ्यांचेही पाठबळ राहिलेले आहे. सत्ता स्वार्थाच्या मर्यादेमुळे नेत्यांनाही नगरसेवकांच्या कारभाराला लगाम घालणे अवघड झाल्याचे चित्र आहे.
तासगाव शहरात विकासात्मक योजना राबविण्यासाठी पालिकेकडे स्वत:च्या मालकीची जागा नाही. अनेक जागांवर आरक्षण असूनदेखील केवळ जागा नसल्यामुळे अनेक योजना प्रत्यक्षात अमलात आणता येत नसल्याचे चित्र आहे. पालिकेच्या कारभाराचे भीषण चित्र काँग्रेसचे तालुकाध्यक्ष महादेव पाटील यांनी जनतेसमोर आणले. अर्थात कारभाऱ्यांच्या कारभाराचे प्रताप तासगावकर जनतेला नवखे आहेत, असेही नाही. नागरिकांच्या सोयीसाठी पालिकेने शहराचा विकास आराखडा राबवताना, अनेक ठिकाणी शहरातील महत्त्वाच्या जागा आरक्षित केल्या होत्या. मात्र या आरक्षित जागांचा विकास पालिकेकडून झाला नाही. याउलट बहुतांश नगरसेवकांनी आरक्षित जागांवर डल्ला मारण्याचे उद्योग केले. काहींनी स्वत: डल्ला न मारता अतिक्रमणधारकांकडून अप्रत्यक्ष डल्ला मारण्याचे उद्योग केले.
पालिकेत गेल्या काही महिन्यांपासून भाजपची सत्ता आहे. या सत्तेत असणाऱ्या काही कारभाऱ्यांनी मोक्याच्या जागा हडप केल्या आहेत. किंंबहुना पालिकेतील सत्तेचा पूर्वेतिहास पाहिल्यास प्रत्येकवेळी सत्तेत असणाऱ्या काही नगरसेवकांकडून भूखंडाचे श्रीखंड घशात घालण्याचे उद्योग केलेले आहेत.
माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांची स्वबळावर सत्ता असताना, आता खासदार संजयकाका पाटील यांची स्वबळावर सत्ता असताना, आबा-काका गटाची तसेच काँग्रेस-राष्ट्रवादीची सत्ता असतानादेखील बेकायदा जागांवर अतिक्रमणाचे उद्योग सुरूच होते.
श्रीपाद व्यायाम मंडळाची ३५ गुंठे जागाही शहरातील महत्त्वाच्या ठिकाणी आहे. या सर्वच जागेवर बेकायदेशीर इमारत उभारण्यात आलेल्या आहेत. यापूर्वी या जागेवरील बेकायदेशीर इमारत पाडण्याचे आदेश तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी दिले होते. मात्र राजकीय हितसंबंधांतून कोणतीच कारवाई झालेली नाही. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठपुरावा करणार आहे. मुख्याधिकाऱ्यांनीही ही जागा आरक्षित असल्याचा खुलासा केला आहे. त्यामुळे कोणत्याही राजकीय दबावाला बळी न पडता श्रीपाद व्यायाम मंडळाची जागा खुली करुन देण्यासाठी पुढाकार घ्यावा.
- महादेव पाटील,
तालुकाध्यक्ष, काँग्रेस.
नगरसेवकांकडून पालिकेच्या आरक्षित जागा ढापण्याचे प्रकार निश्चित दुदैवी आहेत. पालिकेतील सत्ताधाऱ्यांच्या कारभाराचा योग्यवेळी भांडाफोड केला जाईल. शहरातील पालिकेच्या मालकीच्या जागेवर झालेल्या बेकायदा बांधकामाबाबत कारवाई करण्याचे अधिकारी मुख्याधिकाऱ्यांना आहेत. शहरातील सर्वच बेकायदा बांधकामे काढण्याची मागणी राष्ट्रवादीच्यावतीने मुख्याधिकाऱ्यांकडे करणार आहोत. मुख्याधिकाऱ्यांनीही कोणाच्याही दबावाला बळी न पडता नियमानुसार कठोर कारवाई करायला हवी. अन्यथा या विरोधात आवाज उठवू.
- अमोल शिंदे, नगरसेवक, राष्ट्रवादी
राजकीय शब्दफेक : प्रश्न कारवाईचा...