उन्हाळ्यात बाजारपेठांची वेळ वाढवावी : सुधीर गाडगीळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2020 12:43 PM2020-05-31T12:43:14+5:302020-05-31T12:45:01+5:30
त्यामुळे व्यापा-यांना दिलासा मिळाला होता. मात्र सध्या मे महिन्याच्या तीव्र उन्हाळ्याचा परिणाम दिसू लागला आहे. दुपारी कडक उन्हामुळे नागरिक घराबाहेर पडत नाही. तर सायंकाळी ५ वाजता दुकाने बंद होत असल्याने नागरिक आणि दुकानदार दोघांचीही गैरसोय होत आहे.
सांगली : कोरोना संसर्ग रोखण्यासाठी जिल्ह्यात लॉकडाऊन लागू आहे. त्यामुळे महापालिका क्षेत्रातील बाजारपेठेतील दुकानांची वेळ सकाळी ९ ते सायंकाळी ५ अशी आहे. मात्र तीव्र उन्हाळा असल्याने दुपारच्या वेळेत नागरिक घराबाहेर पडत नाहीत. त्यामुळे दुकानांची वेळ सायंकाळी ७ वाजेपर्यंत वाढवावी, अशी सूचना आमदार सुधीर गाडगीळ यांनी जिल्हाधिकाऱ्यांना केली आहे.
यासंदर्भात जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांना दिलेल्या निवेदनात गाडगीळ यांनी म्हटले आहे की, कोरोनामुळे लॉकडाऊन काळात गेली दोन महिने बाजारपेठ बंद ठेवण्यात आली होती. गेल्या आठवड्यापासून बाजारपेठा सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत सुरु करण्यात आली होती. त्यामुळे व्यापा-यांना दिलासा मिळाला होता. मात्र सध्या मे महिन्याच्या तीव्र उन्हाळ्याचा परिणाम दिसू लागला आहे. दुपारी कडक उन्हामुळे नागरिक घराबाहेर पडत नाही. तर सायंकाळी ५ वाजता दुकाने बंद होत असल्याने नागरिक आणि दुकानदार दोघांचीही गैरसोय होत आहे.
त्यामुळे दुकाने बंद करण्याची वेळ बदलावी, अशी मागणी नागरिक तसेच दुकानदारांनी आमच्याकडे केली होती. तीव्र उन्हाळ्यामुळे नागरिक दुपारच्या वेळेस घराबाहेर पडत नाहीत. त्यामुळे दुकानदारांना त्याचा फटका बसत आहे. तर सायंकाळी पाच वाजता दुकाने बंद होत असल्याने ग्राहकांची गैरसोय होत आहे. त्यामुळे बाजारपेठेतील दैनंदिन व्यवहाराची वेळ सकाळी ९ ते सायंकाळी ७ अशी करावी. यामुळे दुकानदार आणि नागरिक दोघांचीही गैरसोय होणार नाही.