शक्तिपीठ महामार्गासाठी सांगली जिल्ह्यात चिन्हांकनास सुरुवात, राज्य शासनाच्या मंजुरीनंतर कामाला गती

By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2024 02:06 PM2024-02-12T14:06:00+5:302024-02-12T14:06:20+5:30

जिल्ह्यातील कवठेमहांकाळ, तासगाव, मिरज तालुक्यांना या महामार्गाचा लाभ होणार

Marking has started in Sangli district for Shaktipeeth Highway | शक्तिपीठ महामार्गासाठी सांगली जिल्ह्यात चिन्हांकनास सुरुवात, राज्य शासनाच्या मंजुरीनंतर कामाला गती

शक्तिपीठ महामार्गासाठी सांगली जिल्ह्यात चिन्हांकनास सुरुवात, राज्य शासनाच्या मंजुरीनंतर कामाला गती

सांगली : वर्धा ते पत्रादेवी हा शक्तिपीठ द्रुतगती महामार्गसांगली जिल्ह्यातून जाणार आहे. याच्या भूसंपादनास राज्य शासनाने मंजुरी दिल्यानंतर सांगली जिल्ह्यात यााठी चिन्हांकनाच्या (मार्किंग) कामास सुरुवात झाली आहे. कर्नाळ, पद्माळे, बुधगाव, कवलापूर येथे शनिवारी चिन्हांकन करण्यात आले. जिल्ह्यातील कवठेमहांकाळ, तासगाव, मिरज तालुक्यांना या महामार्गाचा लाभ होणार आहे.

वर्धा ते पत्रादेवी हा शक्तिपीठ द्रुतगती मार्ग नागपूर आणि गोव्याला जोडणार आहे. हा एक्स्प्रेस वे महाराष्ट्रातील पूर्व, पश्चिम आणि दक्षिणेतील तीन शक्तिपीठांना जोडला जाणार आहे. महाराष्ट्र आणि गोवा यांच्यातील संपर्क सुधारण्यासाठी महाराष्ट्र सरकारने शक्तीपीठ किंवा नागपूर-गोवा द्रुतगती मार्ग बांधण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. सहापदरी एक्स्प्रेस वेमुळे प्रवासाचा वेळ २१ तासांवरून ८ तासांवर येईल. शक्तिपीठ द्रुतगती महामार्ग हा महाराष्ट्रातील १२ जिल्ह्यांना जोडणारा ८०२ किलोमीटरचा महामार्ग असेल. सुरुवातीला तो ७६० किलोमीटरचा होता. त्यात वाढ झाली आहे.

जिल्ह्यात या गावांमध्ये मार्किंग

सांगोला तालुक्यातून सांगली जिल्ह्यात खानापूर तालुक्यातील बाणुरगडमध्ये महामार्गाचा प्रवेश होईल. तिथून कवठेमहांकाळ तालुक्यात तिसंगी, तासगाव तालुक्यातील डोंगरसोनी, सावळज, अंजनी, वज्रचौंडे, मणेराजुरी, मतकुणकीतून मिरज तालुक्यातील कवलापूर, बुधगाव, कर्नाळ, पद्माळे, सांगलीवाडी अशा गावांमधून तो जाणार असल्याने या ठिकाणी मार्किंग केले जात आहे.

राज्य शासनाकडून नुकतीच मंजुरी

  • महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत या महामार्गाचे काम केले जाणार आहे.
  • या प्रकल्पाचा तांत्रिक व वित्तीय अहवाल सादर करण्याचे आदेश उपमुख्यमंत्र्यांनी सप्टेंबर २०२२ मध्ये दिले होते.
  • त्यानुसार सादर झालेल्या आराखड्याला ७ फेब्रुवारी २०२३ रोजी मान्यता देण्यात आली.
  • या प्रकल्पातून मोठ्या प्रमाणात धार्मिक पर्यटन वाढण्याची शासनाला अपेक्षा आहे.

Web Title: Marking has started in Sangli district for Shaktipeeth Highway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.