चोवीस नोव्हेंबरपासून सुरू होणार विवाहांचा धुमधडाका...
By admin | Published: November 9, 2015 10:47 PM2015-11-09T22:47:26+5:302015-11-09T23:27:33+5:30
मे महिन्यात एकच मुहूर्त : चातुर्मासाचा मुहूर्तावर परिणाम नाही
ताकारी : यंदाचा तुलसी विवाह २३ नोव्हेंबरला आहे. ‘शुभमंगल सावधानऽऽ’सह सनई-चौघड्याचा सूर २४ नोव्हेंबरपासून सर्वत्र घुमणार आहे. २४ नोव्हेंबर ते जुलै २0१६ या कालावधित एकूण ७४ विवाह मुहूर्त आहेत. यामध्ये ४४ मुहूर्त गोरज आहेत.
मुहूर्त नसल्याने १३ जून २0१५ पासून विवाहांचा धुमधडाका बंद होता. यंदा सिंहस्थ कुंभमेळा, कोकीळा व्रत, अधिक मासामुळे विवाहाचे मुहूर्तच नसल्याचा गैरसमज विवाहइच्छुकांसह नातेवाईकांमध्ये होता. मात्र चातुर्मासही त्या कालावधित आला असल्याने विवाह मुहूर्तावर त्याचा परिणाम नाही. तुलसी विवाहानंतर विवाह मुहूर्तास प्रारंभ होत असतो. यंदा डिसेंबर व फेबु्रवारी महिन्यात सर्वाधिक १४ मुहूर्त आले आहेत. मे महिन्यात एकच मुहूर्त आला आहे. विवाह मुहूर्त निवडताना अनेकजण सुट्टीचा विचार करीत असतात. मे महिन्यात शाळांना सुट्टीच असते. मात्र यंदा वैशाख, ज्येष्ठ महिन्यात अर्थात मे व जून महिन्यात शुक्राचा अस्त असल्याने विवाह मुहूर्तच नाहीत. त्यामुळे मे महिन्यात पंचांगात एकच मुहूर्त दिलेला आहे. उर्वरित कालावधित मुहूर्त आहेत.
यंदा वास्तुशांतीचे ४२ मुहूर्त असून, १३ नोव्हेंबर २0१५ ते ४ एप्रिल २0१६ या कालावधित ते आहेत. (वार्ताहर)
तुलसी विवाहानंतर होणार आरंभ
तुलसी विवाहानंतर खऱ्याअर्थाने विवाहाच्या धुमधडाक्याला आरंभ होत असल्याने मंगल कार्यालये, बँडवाले, आचारी, भडजी, केटरर्स, मंडप डेकोरेटर्स, कापड व्यापारी, छायाचित्रकार, किराणा व्यापारी, फूलवाले, पत्रिका छपाईवाले आदी सर्व लोकांचा फायदा होणार आहे. त्यादृष्टीने त्यांची तयारीही सुरू झाली आहे. गतवर्षी कमी तिथी असल्यामुळे त्यांचे नुकसान झाले होते.