Sangli: दोघा भावांचा अल्पवयीन मुलींशी विवाह, विवाह पथकाला धक्काबुक्की
By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2024 03:43 PM2024-06-27T15:43:31+5:302024-06-27T15:44:38+5:30
पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत कार्यकर्त्यांची सुटका केली
सांगली : मिरज तालुक्यातील एका गावात बालविवाह सुरू असल्याची माहिती चाइल्ड लाइन संस्थेला मिळाली. तो थांबविण्यासाठी धावलेल्या कार्यकर्त्यांना संतप्त जमावाने धक्काबुक्की केली. संजयनगर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत कार्यकर्त्यांची सुटका केली.
बालकल्याण समितीच्या आदेशानंतर तातडीने गुन्हा दाखल केला जाईल, अशी माहिती निरीक्षक बयाजीराव कुरळे यांनी दिली. या गावातील दोघा भावांचा दोन अल्पवयीन मुलीशी विवाह नियोजित होता. ही माहिती चाइल्ड लाइन संस्थेला हेल्पलाइनद्वारे मिळाली. त्यांनी तातडीने बालकल्याण समितीला माहिती दिली. त्यांच्या निर्देशानुसार विवाहस्थळी पथक दाखल झाले.
तत्पूर्वीच विवाह संपन्न झाला होता. चाइल्ड लाइन टीमने चित्रीकरणाला सुरुवात केली. त्यावेळी नातेवाइकांनी धक्काबुक्की केली. याची माहिती मिळताच पोलिसांचे पथक दाखल झाले. त्यानंतर बालकल्याण समितीकडे सारी माहिती देण्यात आली. चाइल्ड लाइनचे प्रियांका माने, मिनाज शेख, शानुर दांनवाडे, विशाल पाटोळे, आरती निडसोशे, इम्तियाज हकीम यांनी विवाह रोखण्याचा प्रयत्न केला.