मुलगी झाल्याने विवाहितेचा छळ करून घराबाहेर काढले, सांगलीत पतीसह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2025 18:40 IST2025-04-19T18:39:29+5:302025-04-19T18:40:24+5:30
सांगली : मुलगी झाल्यामुळे विवाहितेचा छळ करून तिला घराबाहेर काढल्याबद्दल पती पंकज महादेव कोळेकर, सासू अंजना महादेव कोळेकर, सासरे ...

मुलगी झाल्याने विवाहितेचा छळ करून घराबाहेर काढले, सांगलीत पतीसह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल
सांगली : मुलगी झाल्यामुळे विवाहितेचा छळ करून तिला घराबाहेर काढल्याबद्दल पती पंकज महादेव कोळेकर, सासू अंजना महादेव कोळेकर, सासरे महादेव कोळेकर, दीर विनायक कोळेकर, जाऊ स्वप्नाली कोळेकर (रा. संभाजीनगर, सामाजिक न्यायभवनसमोर, जुना बुधगाव रस्ता, सांगली) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. विवाहिता सोनाली कोळेकर (वय २१) हिने याबाबत शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सोनाली कोळेकर हिचा एप्रिल २०२२ मध्ये पंकज याच्याशी विवाह झाला आहे. विवाहानंतर त्यांना जानवी नावाची मुलगी आहे. लग्नानंतर सोनाली हिचा सासरी छळ सुरू होता. किरकोळ कारणावरून पती, सासू मारहाण करीत होते. दीर-जाऊ उपाशी ठेवत होते. ‘तुझ्या आईला पाच मुली आहेत. तुलाही तशाच मुली होतील,’ असे म्हणून मानसिक व शारीरिक छळ करीत होते. दि. २७ रोजी सोनाली यांची आई भेटण्यास आली. तेव्हा सासूने तिला ‘आमच्या मुलाचे दुसरे लग्न करायचे आहे,’ असे सांगितले. कारण विचारल्यानंतर ‘हिलापण तुमच्यासारख्याच मुली होतील,’ असे म्हणून हिणवले.
पतीने देखील सोनाली हिच्या आईला, ‘माझे इच्छेविरुद्ध लग्न केले आहे, मला सोडचिठ्ठी पाहिजे,’ असे सांगितले. दीरानेदेखील सोनाली यांच्या वडिलांशी वाद करून ‘तुमची मुलगी पांढऱ्या पायाची आहे,’ असे म्हटले. त्यानंतर सर्वांनी मुलीस घेऊन जा, असे सांगून घराबाहेर हाकलले. अखेर सोनाली हिने पती, सासू, सासरे, दीर, जाऊ यांच्याविरुद्ध फिर्याद दिली.