सांगलीत वाटमारी करणारी टोळी जेरबंद
By admin | Published: July 19, 2015 11:09 PM2015-07-19T23:09:53+5:302015-07-20T00:04:30+5:30
चौघांचा समावेश : गुन्ह्याचा छडा; सात दिवस पोलीस कोठडी
सांगली : शहरात रात्रीच्यावेळी लोकांना अडवून चाकूच्या धाकाने लुटणाऱ्या टोळीचा छडा लावण्यात विश्रामबाग पोलिसांना रविवारी पहाटे यश आले. टोळीतील चौघांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून गेल्या आठवड्यात काळ्या खणीजवळ चार तरुणांना लुटलेल्या गुन्ह्याचा छडा लागला आहे, अशी माहिती पोलीस उपअधीक्षक प्रकाश गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत दिली. आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असल्याचे गायकवाड यांनी सांगितले.
अटक केलेल्यांमध्ये टोळीचा मुख्य सूत्रधार सागर तातोबा पारेकर (वय १९, शिंदे मळा), सूरज सिकंदर मुल्ला (१९, अभयनगर), प्रमोद शामराव माने (२१, पाटणे प्लॉट, संजयनगर) व हबीब मज्जीद शेख (२६, राम रहिम कॉलनी, शिंदे मळा, सांगली) यांचा समावेश आहे. न्यायालयाने त्यांना सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. शंभर फुटी रस्त्यावरील संकेत बसाटे, संकेत खाडे, तानाजी गावडे, जवाहर वीरकर, सचिन झळकी व महेश गळवे स्वरुप चित्रपटगृहात सिनेमा पाहण्यासाठी गेले होते. रात्री साडेअकरा वाजता सिनेमा पाहून ते काळी खणमार्गे ते पुष्पराज चौकाकडे निघाले होते. त्यावेळी खणीजवळ संशयितांनी त्यांना अडविले. चाकूचा धाक दाखवून संकेत बसाटेसह चौघांच्या खिशातील चार मोबाईल व पाकिटातील दोन हजाराची रोकड, मतदान ओळखपत्रासह अन्य महत्त्वाची कागदपत्रे घेऊन पलायन केले होते.
रविवारी रात्री पोलीस निरीक्षक अनिल चोरमले, सहायक निरीक्षक भगवान शिंदे, प्रभाकर गायखे, सहायक फौजदार सुनील कोलप, वसंत किर्वे, अभिजित पाटील, नीलेश कोळेकर, लक्ष्मण कौजलगी, गुंडोपंत दोरकर, पृथ्वी कांबळे यांचे पथक ईदनिमित्त गस्त घालत होते. त्यावेळी अभिजित पाटील यांना काळ्या खणीजवळ चौघांना लुटणाऱ्या टोळीतील संशयितांची माहिती मिळाली. पथकाने संशयित सूरज मुल्ला, हबीब शेख, प्रमोद माने यांना ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिली. टोळीचा सूत्रधार पारेकर हा घरात नव्हता. तो रूपसिंगपेठ (ता. जमखंडी) येथे एका महिलेच्या घरात आश्रयाला असल्याची माहिती मिळाल्याने त्याच्या शोधासाठी सहायक निरीक्षक भगवान शिंदे मध्यरात्री जमखंडीला रवाना झाले. तेथील पोलिसांच्या मदतीने या महिलेच्या घरावर छापा टाकून पारेकरला ताब्यात घेतले. संशयितांच्या घरावर छापे टाकून घेण्यात आलेल्या झडतीत संकेत बसाटेसह त्याच्या मित्रांचे मतदान ओळखपत्र, वाहन चालविण्याचा परवाना (लायसन्स), महाविद्यालयाचे ओळखपत्र सापडले आहे. (प्रतिनिधी)
शेंडी, टिळा गायब
पारेकर हा रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्याच्याकडून सहा महिन्यांपूर्वी एक गावठी पिस्तूल जप्त केले होते. लूटमारीवेळी त्यानेच चौघांना चाकूचा धाक दाखविला होता. संकेत बसाटे याने फिर्याद देताना एका संशयिताच्या डोक्याला शेंडी व कपाळाला टिळा होता, असे वर्णन केले होते. त्याचे हे वर्णन वृत्तपत्रांमधून प्रसिद्ध झाले होते. त्यामुळे पोलीस आपल्यापर्यंत पोहोचणार, असा त्यास संशय होता. त्यामुळे तो कर्नाटकात पळाला होता.