हुतात्मा स्मारकेच होताहेत ‘हुतात्मा’
By admin | Published: January 14, 2015 10:05 PM2015-01-14T22:05:18+5:302015-01-14T23:51:45+5:30
शिराळा तालुक्यातील स्थिती : स्मारकांच्या आवारात शेणी, कडबा; पार्ट्यांसाठीही वापर
विकास शहा - शिराळा -दिल्ली येथील लाल किल्ल्यावर तिरंगा फडकताना पाहताना मन भरून येते. असाच जल्लोष खेड्या-पाड्यातही होतो. पण ज्यांच्या बलिदानामुळे हा देश स्वतंत्र झाला, अशा हुतात्म्यांच्या स्मरणार्थ बांधण्यात आलेली हुतात्मा स्मारके शेवटची घटका मोजत आहेत. तसेच या स्मारकांच्या आवारात शेणी रचल्या जातात, गाड्यांचे पार्किंग, कडबा भरणे, तर काही ठिकाणी चक्क पार्ट्याही केल्या जातात. हुतात्म्यांची आठवण राहावी, यासाठी बांधलेली ही हुतात्मा स्मारकेच ‘हुतात्मा’ होण्याच्या मार्गावर आहेत.
शिराळा तालुका हा स्वातंत्र्य लढ्यातील एक ‘सुवर्ण पान’ आहे. स्वातंत्र्यासाठी मोठे योगदान या तालुक्याने दिले आहे. स्वातंत्र्यासाठी बलिदान देण्यासाठी येथील नागरिक तयार होते. काहींनी स्वत:चे दागिने, तर काहींनी आपली मुले अर्पण केली. ‘बिळाशी बंडा’ने संपूर्ण पार्लमेंट हादरुन गेले होती. या गावातील लोकांनी जंगलातून ६0 फुटाचे सागाचे लाकूड कापून आणले व महादेव मंदिराच्या आवारात तिरंगा फडकविला. गावाच्या आसपासचे नागरिक या झेंड्याच्या रक्षणासाठी अहोरात्र जागले. मानवी कडे मोडण्यासाठी पोलिसांनी मारहाण केली. यावेळी इंग्रजांनी परत जाताना मांगरुळ येथे गोळीबार केला. यामध्ये संतू कुंभार व शंकर चांभार ही दोन मुले शहीद झाली. अशाचप्रकारे तालुक्यात स्वातंत्र्यलढ्यात स्वातंत्र्यवीर हुतात्मा झाले.
या हुतात्म्यांच्या स्मरणार्थ मांगरुळ, बिळाशी, चरण, आरळा, मणदूर या ठिकाणी शासनाने या हुतात्म्यांच्या बलिदानाची आठवण व्हावी, तसेच नवीन पिढीस चांगला आदर्श मिळावा यासाठी हुतात्मा स्मारके बांधली. ही स्मारके बांधली, मात्र त्यांची निगा राखणे व रक्षण करणे जमले नाही. याउलट या स्मारकांची विटंबना होऊ लागली आहे. या स्मारकांच्या संरक्षक भिंती पडल्या आहेत. लोखंडी गेट गायब आहेत. मुख्य स्मारकात बसविलेले पंखे, दरवाजे, खिडक्या आदी सर्व साहित्य गायब झाले आहे. आता ही स्मारकेही कधी पडतील हे सांगता येत नाही. या स्मारकात कडबा भरणे, आवारात शेणी थोपणे, तसेच वाहने पार्क करण्यात येतात. तसेच काही ठिकाणी पार्ट्याही केल्या जातात. या स्मारकांच्या आवारात लावण्यात आलेली झाडेही गायब होत आहेत. या स्मारकांचे रक्षण करण्यास कोणासच वेळ नाही.
शासकीय अधिकारी निगा राखण्यासाठी निधी नसल्याचे सांगतात, ग्रामपंचायती हे आमच्या कार्यात येत नाही, तर नागरिक हे सर्व शासनाचे काम आहे, असे म्हणून या स्मारकांचा हवा तसा उपयोग करीत आहेत.
२६ जानेवारी व १५ आॅगस्ट या दोन दिवशी या स्मारकांची शासनास आठवण येते. थोडी साफसफाई करून झेंडा फडकवला जातो आणि त्यानंतर पुन्हा ‘जैसे थे’.
निंगा राखण्यासाठी निंधी नाही...
देशासाठी बलिदान देणाऱ्या वीरांची आठवण राहावी, या उदात्त हेतूने शासनाने गावोगावी ‘हुतात्मा’ स्मारकांची उभारणी केली खरी, पण या स्मारकांच्या देखभालीबाबत मात्र कमालीची उदासीनता आहे. देखभालीबाबत विचारले असता शासकीय अधिकारी, या स्मारकांची निगा राखण्यासाठी निधी नसल्याचे सांगतात. ग्रामपंचायत कार्यालये, हे आमच्या कार्यकक्षेत येत नाही, असे म्हणणे मांडतात, तर नागरिक, हे काम शासनाचे आहे, असे म्हणून या स्मारकांचा हवा तसा उपयोग करीत आहेत. परिणामी एका अर्थाने या स्मारकांची विटंबनाच होत आहे.