‘हुतात्मा’कडून १५ टक्के वेतनवाढ
By admin | Published: October 18, 2016 12:21 AM2016-10-18T00:21:00+5:302016-10-18T00:56:04+5:30
वैभव नायकवडी यांची घोषणा : त्रिपक्षीय समितीचा निर्णय
वाळवा : साखर कामगारांच्या वेतनवाढीच्या त्रिपक्षीय करारानुसार हुतात्मा साखर कारखान्याच्या कायम व हंगामी कामगारांच्या वेतनामध्ये आॅक्टोबरपासून १५ टक्के वेतनवाढ केल्याची घोषणा अध्यक्ष वैभव नायकवडी यांनी केली.
ही वेतनवाढ देणारा राज्यातील ‘हुतात्मा’ साखर कारखाना हा पहिला आहे. साखर कामगारांच्या वेतनवाढीसाठी दि. ४ जुलै १६ रोजी महाराष्ट्र राज्य साखर संघाचे अध्यक्ष शिवाजीराव गिरधर पाटील यांच्या अध्यक्षतेखाली त्रिपक्षीय समिती नेमण्यात आली होती. या समितीमध्ये महाराष्ट्र शासन साखर संघ व कामगार प्रतिनिधींचा समावेश होता. या बैठकीनंतर वेतनवाढ निश्चित करण्यात आली. त्यानुसार करारनामाही करण्यात आला. या करारानुसार कारखान्याच्या हजेरी पत्रकावर असलेले हंगामी व कायम कामगारांना ‘हुतात्मा’ने १५ टक्के वाढ सध्याच्या आॅक्टोबर पगारातून देण्याची घोषणा सोमवारी कारखाना कार्यस्थळी झालेल्या कामगारांच्या गेटवरील बैठकीत करण्यात आली.
दि. १ जुलै २०१५ पासूनची फरकाची एकूण १७ महिन्यांची रक्कम ही करार समाप्तीचे मुदतीपर्यंत देण्यात येणार असल्याचे अध्यक्ष वैभव नायकवडी यांनी सांगितले. या वेतनवाढीचा लाभ कारखान्यातील ४३३ कामगारांना होणार आहे. यावेळी कारखाना कार्यकारी संचालक नरेंद्र कापडणीस, वित्त व्यवस्थापक दिलीप पाटील, जनरल मॅनेजर (केन) दीपक पाटील, अकौंटंट भागवत आव्हाड, सिव्हिल अभियंता जयवंत शिंदे, उत्पादनाचे बी. एस. माने, वर्क्स मॅनेजर अनिल पाटील, लेबर आॅफिसर अजित माळी उपस्थित होते. (वार्ताहर)
वाळवा येथे ‘हुतात्मा’चे अध्यक्ष वैभव नायकवडी यांनी वेतनवाढीची माहिती दिली. यावेळी नरेंद्र कापडणीस यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.