दरात हुतात्मा, राजारामबापूच लय भारी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 7, 2017 12:49 AM2017-11-07T00:49:13+5:302017-11-07T00:54:33+5:30

Martyrdom at the rate, Rajaram Bapu's rhythm heavy! | दरात हुतात्मा, राजारामबापूच लय भारी!

दरात हुतात्मा, राजारामबापूच लय भारी!

Next


सांगली : साखर कारखानदार आणि संघटनांमध्ये झालेल्या तडजोडीनुसार उसाला एफआरपी अधिक २०० रुपये दर निश्चित झाला आहे. या फॉर्म्युल्यानुसार जिल्ह्यातील कारखान्यांकडून तोडणी आणि वाहतूक खर्च वजा जाता टनाला २३०० ते ३१०० रुपये हातात पडतील. राजारामबापू, हुतात्मा कारखान्यांचा दर उच्चांकी राहणार आहे. महांकाली, वसंतदादा, माणगंगा, सदगुरू श्री श्री शुगर कारखान्यांची एफआरपीच कमी असल्यामुळे ते फॉर्म्युल्यापेक्षाही जादा दर देण्याच्या प्रयत्नात आहेत.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक-अध्यक्ष खासदार राजू शेट्टी, रयत क्रांती संघटनेचे संस्थापक, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथदादा पाटील आणि साखर कारखानदारांची कोल्हापूर येथे रविवारी बैठक झाली. या बैठकीमध्ये २०१७-१८ च्या गळीत हंगामासाठी एफआरपी अधिक २०० रुपये प्रतिटन देण्याचा फॉर्म्युला निश्चित झाला. तोच फॉर्म्युला सांगली जिल्ह्यातील साखर कारखानदारांनीही मान्य केला आहे. काही साखर कारखानदारांची एफआरपी कमी आहे. यामुळे या कारखानदारांनी उसाची उपलब्धता होण्याच्यादृष्टीने जादा दर देण्याची घोषणा केली आहे. सांगलीतील वसंतदादा (दत्त इंडिया) कारखान्याच्या व्यवस्थापनाने तोडणी आणि वाहतुकीसह तीन हजार रुपयापेक्षा जादा दर देण्याची तयारी दर्शविली आहे. आटपाडी तालुक्यातील माणगंगा, सदगुरू श्री श्री शुगर, खानापूर तालुक्यातील यशवंत, जत तालुक्यातील डफळे आणि कवठेमहांकाळ तालुक्यातील महांकाली या कारखान्यांची एफआरपी कमी आहे. यापैकी यशवंत, डफळे कारखान्यांचे गळीत चालू होण्याची शक्यता कमीच आहे. उर्वरित तीन कारखाना व्यवस्थापनानेही एफआरपी अधिक २०० यापेक्षाही जादा दर देऊन ऊस उचलण्याची तयारी दर्शविली आहे.
राजारामबापू कारखान्याच्या साखराळे, वाटेगाव आणि सर्वोदय या तीनही युनिटची एफआरपी साडेबारा टक्क्याहून जास्त आहे. यामुळे या कारखान्यांचा तोडणी आणि वाहतुकीसह दर प्रतिटन ३४३९ पर्यंत आहे. हुतात्मा कारखान्याचा २०१६-१७ गळीत हंगामातील साखर उतारा १२.९९ टक्के होता. यामुळे या कारखाना कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादकांना टनाला ३४८५.३२ रुपये दर मिळणार आहे. यात तोडणी आणि वाहतुकीच्या खर्चाचा समावेश आहेच. जिल्ह्यातील पाच कारखाने वगळल्यास सर्वच कारखान्यांचा दर तीन हजार रुपयांपुढे जाणार आहे.
दराची कोंडी फुटल्यामुळे कारखान्यांच्या गळीत हंगामालाही आता गती मिळणार असल्याचे दिसत आहे. शेतकरी संघटनांच्या लढ्यामुळेच ऊस उत्पादकांच्या पदरी चांगला दर मिळाल्याची भावना शेतकरी वर्गामध्ये आहे. सोमवारपासून ऊसवाहतूकही सुरू झाल्याचे दिसत होते.
दि. २२ आॅक्टोबर २००९ रोजीच्या साखर नियंत्रण आदेशामध्ये सुधारणा केली आहे. त्यामध्ये ऊस उत्पादकांची जोखीम आणि लाभ विचारात घेऊन, माफक नफा मिळण्याची तरतूद केलेली आहे. त्यानुसार १ आॅक्टोबर २००९ पासून साखरेच्या हंगामांचा रास्त व किफायतशीर भाव (एफआरपी) निश्चित करण्याचा अधिकार केंद्र शासनास आहे. त्यानुसार केंद्र शासनाने २०१७-१८ च्या गळीत हंगामासाठी जाणाºया उसाला ९.५० टक्के साखर उताºयासाठी २५५० रुपये आणि त्यापुढील प्रत्येक टक्क्याला २६८ रुपये एफआरपी निश्चित केली आहे.

असा असेल दर (तोडणी, वाहतूक)
कारखाना उतारा दर (रुपये)
वसंतदादा (दत्त इंडिया) ९ २५५०
राजारामबापू (साखराळे) १२.८२ ३४३९.७६
विश्वास १२.०५ ३२३३.०४
हुतात्मा १२.९९ ३४८५.३२
माणगंगा ९.८४ २६४१.१२
महांकाली १०.६४ २८५५.५२
राजारामबापू (वाटेगाव) १२.६३ ३३८८.८४
डफळे ९ २५५०
सोनहिरा १२.५९ ३३७८.१२
क्रांती ११.९३ ३२०१.२४
सर्वोदय १२.७५ ३४२१
मोहनराव शिंदे ११.१८ ३०००.२४
निनाईदेवी (दालमिया) ११.६४ ३१२३.५२
यशवंत (नागेवाडी) ९ २५५०
केन अ‍ॅग्रो (डोंगराई) ११.४६ ३०७५.२८
उदगिरी शुगर ११.७० ३१३९.०६
सदगुरु श्री श्री शुगर ९.८८ २६५१.८४
तोडणी, वाहतूक खर्च ५०० ते ७०० रुपये
क्रांती साखर कारखान्याचा ऊसतोडणी आणि वाहतूक खर्च प्रतिटन ५०० रुपये, तर राजारामबापू, हुतात्मा, सर्वोदय, मोहनराव शिंदे या कारखान्यांचाही खर्च जवळपास तेवढाच आहे. वसंतदादा, माणगंगा, महांकाली या कारखान्यांचा तोडणी व वाहतूक खर्च ७०० ते ९०० पर्यंत दाखविला आहे. संघटना आणि कारखानदारांमध्ये ठरलेल्या फॉर्म्युल्यातून तोडणी आणि वाहतूक खर्च वजा होऊन ऊस उत्पादक शेतकºयांच्या हाती २४०० ते ३१०० रुपयांपर्यंत अंतिम दर मिळण्याची शक्यता आहे.

Web Title: Martyrdom at the rate, Rajaram Bapu's rhythm heavy!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :agricultureशेती