मारुती चौक, काँग्रेस भवनात सन्नाटा फौजदार गल्लीत जल्लोष : पोलिसांकडून खबरदारीसाठी रस्ते ‘पॅक’
By admin | Published: May 17, 2014 12:17 AM2014-05-17T00:17:14+5:302014-05-17T00:18:42+5:30
सांगली : लोकसभा निवडणुकीचा निकाल भाजपच्या बाजूने झुकू लागताच शहरातील पक्षाच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष सुरू केला. काँग्रेसचे उमेदवार प्रतीक पाटील यांचे कार्यालय,
सांगली : लोकसभा निवडणुकीचा निकाल भाजपच्या बाजूने झुकू लागताच शहरातील पक्षाच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष सुरू केला. काँग्रेसचे उमेदवार प्रतीक पाटील यांचे कार्यालय, काँग्रेस भवनसह भाजप उमेदवार संजय पाटील यांच्याविरोधात बंडाचा झेंडा हाती घेतलेल्या आमदार संभाजी पवार यांचे कार्यालय असलेल्या मारुती चौकात मात्र सन्नाटा पसरला होता. पोलिसांनी काँग्रेस भवन व मारुती चौकात कडक बंदोबस्त ठेवत रस्तेच अडविले होते. सांगली लोकसभा मतदारसंघातून भाजपचे संजय पाटील यांच्या विजयानंतर शहरात पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. सकाळी मतमोजणीला सुरुवात होताच संजय पाटील यांनी आघाडी घेतल्याचे वृत्त येऊन धडकले. कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी जल्लोष सुरू केला. दुचाकींवरून गुलालाची उधळण करीत शहरातून फेरी काढली. कार्यकर्त्यांची वाहने मतमोजणी केंद्राकडे सुसाट धावत होती. संजय पाटील सांगली-मिरज रस्त्यावरील हॉटेलवर थांबून होते. दुपारी पावणेबारा वाजता ते हॉटेलमधून बाहेर आले. यावेळी मिरजेचे आमदार सुरेश खाडे, राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष माजी आमदार दिनकर पाटील त्यांच्यासोबत होते. यावेळी कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर गुलालाची उधळण करत घोषणांनी परिसर दणाणून सोडला. त्यानंतर ते मतमोजणी केंद्राकडे रवाना झाले. भाजपचे कार्यकर्ते जल्लोष साजरा करीत असताना काँग्रेसच्या गोटात मात्र सन्नाटा पसरला होता. काँग्रेस भवन व शेजारच्या प्रतीक पाटील यांच्या कार्यालयात शुकशुकाट होता. दुपारी दोननंतर प्रतीक पाटील यांचे कार्यालय कुलूपबंद झाले. काँग्रेस भवन परिसरात पोलिसांनी कडक पहारा ठेवला होता. गुलालात माखलेल्या कार्यकर्त्यांना पोलिसांकडून अडविले जात होते. संजय पाटील यांच्याविरोधात बंडाचा झेंडा हाती घेणारे भाजपचे आमदार संभाजी पवार यांचे कार्यालय असणारा मारुती चौकही आज शांत दिसत होता. पवार यांच्या कार्यालयात त्यांच्या स्वीय सहाय्यकांसह काही कार्यकर्ते दूरचित्रवाणीवरून निकालाची माहिती घेत होते. पवार व त्यांचे दोन्ही पुत्र कार्यालयाकडे फिरकले नाहीत. संजय पाटील यांचा विजय निश्चित होण्यापूर्वीच मारुती चौकात पोलीस बंदोबस्त होता. चौकाकडे जाणारे तीनही रस्ते बंद करण्यात आले होते. त्यामुळे कार्यकर्ते शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर जल्लोष करीत होते. संजय पाटील यांचा बालेकिल्ला असलेल्या फौजदार गल्लीत मात्र कार्यकर्त्यांनी आतषबाजी करत जल्लोष केला. (प्रतिनिधी)