सांगली: वाळू तस्करी विरोधात उद्या रात्री १२ वाजता 'मशाल मोर्चा'
By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2022 01:39 PM2022-06-27T13:39:46+5:302022-06-27T13:40:43+5:30
येरळा नदीपात्रात रात्रीच्या वेळी अवैद्य वाळू उपसा व वाहतूक सुरू असताना कडेगाव तहसिल प्रशासन मात्र कठोर कारवाई न करता झोपेचे सोंग घेत आहे.
कडेगाव : कडेगाव तालुक्यातील वाळू तस्करावर कठोर कारवाई करावी यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) व शेतकरी संघटना गेली सहा महिन्यापासून वेळोवेळी आंदोलने करीत आहेत. तरी ही कडेगाव तहसिल प्रशासन वाळू तस्करांवर कठोर कारवाईवर गंभीर नसल्याचे दिसून येऊ लागले आहे. याविरोधात उद्या, मंगळवारी रात्री १२ वाजता कडेगाव तहसीलदार कार्यालयावर "मशाल मोर्चा' काढणार येणार आहे.
कडेगावचे प्रांताधिकारी डॉ. गणेश मरकड यांना आर.पी.आय (ए) चे जिल्हाध्यक्ष महादेव होवाळ व शेतकरी संघटनेचे कडेगाव तालुकाध्यक्ष परशुराम माळी यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी याबाबतचे निवेदन दिले आहे.
निवेदनात म्हटले आहे की, अवैद्य वाळू तस्करांकडून आंदोलकांना दमदाटी केली जात आहे. चार दिवसापूर्वी शेतकरी संघटनेचे युवा जिल्हा उपाध्यक्ष विजय माळी यांच्या बाबत गंभीर प्रकार घडला आहे. याप्रकरणी संबंधितावर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. सध्या तालुक्यात येरळा नदीपात्रात रात्रीच्या वेळी अवैद्य वाळू उपसा व वाहतूक सुरू असताना कडेगाव तहसिल प्रशासन मात्र कठोर कारवाई न करता झोपेचे सोंग घेत आहे. यानिषेधार्थ रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए-आंबेडकर) व शेतकरी संघटनेच्यावतीने हा मशाल मोर्चा काढण्यात येणार आहे.