शिंगणापूर घाटात सामूहिक अत्याचार; आरोपीस कोठडी
By Admin | Published: March 13, 2017 11:31 PM2017-03-13T23:31:27+5:302017-03-13T23:31:27+5:30
शिंगणापूर : शिखर शिंगणापूरच्या घाटात प्रेमीयुगुलाचे धाकाने नग्न शूटिंग काढून नंतर तरुणीवर सामूहिक अत्याचार
केल्याप्रकरणी नातेपुते येथे अटक करण्यात आलेल्या आरोपीला पोलिस कोठडी देण्यात आली आहे. दरम्यान, या गंभीर गुन्ह्यातील दुसरा आरोपी अद्याप फरार असून, त्याचा शोध नातेपुते पोलिस घेत आहेत. याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, माळशिरस तालुक्यातील एका महाविद्यालयात शिकणारे प्रेमीयुगुल वर्गाला दांडी मारून शिंगणापूर येथे बुधवार, दि. ८ रोजी फिरावयास आले होते. शिंगणापूर-नातेपुते रस्त्यावरून ते माघारी येत असताना नातेपुते येथील सुनील मारुती माने व त्याच्या मित्राने दोघांना धाक दाखवून अर्धा किलोमीटर अंतरावर आडोशाला नेऊन त्यांना मारहाण करून व धाक दाखवून कपडे काढण्यास भाग पाडले व त्यानंतर अश्लील कृत्य करण्यास भाग पाडून स्वत:च्या मोबाईलमध्ये शूटिंग काढले. यानंतर या नराधमांनी मुलीवर अत्याचार केला व तिच्या अंगावरील सोन्या-चांदीचे दागिने व दोघांचे मोबाईल काढून घेतले. मोबाईलमधील व्हिडिओ क्लिप डीलिट करण्यासाठी दुसऱ्या दिवशी या घटनेतील मुलीच्या मित्राला फोन करून दहा हजारांची खंडणी मागितली असता मित्राने ‘पैसे देतो,’ म्हणून सुनील माने यास अकलूजला बोलावून घेतले व आपल्या इतर मित्रांच्या सहकार्याने तेथे त्याची यथेच्छ धुलाई केली असता जीव वाचविण्यासाठी त्याने नातेपुते पोलिस स्टेशनला फोन करून ‘अकलूज येथे मला मारहाण होत आहे,’ पोलिस संरक्षणाची मागणी केली. नातेपुते पोलिसांनी तातडीने यासंदर्भात अकलूज पोलिस स्टेशनला कळविले व माने यास ताब्यात घेण्यास सांगितले. सुनील माने यास अकलूज येथे मारहाण करण्याचे कारण काय असावे, अशी शंका नातेपुते पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस निरक्षिक सुनील खेडेकर यांना आल्याने त्यांनी तातडीने अकलूज येथे जाऊन चौकशी केली असता हा प्रकार उघड झाला असून, यासंदर्भात नातेपुते पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुनील माने यास अटक करण्यात आली आहे व त्याच्या फरारी साथीदाराचा तपास सहायक पोलिस निरीक्षक खेडेकर, फौजदार देवकाते व जाधव करीत आहेत. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन मंगळवेढ्याचे उपविभागीय पोलिस अधिकारी जगदाळे यांनी नातेपुते पोलिस स्टेशनला भेट देऊन घटनास्थळाची पाहणी केली व तपासाबाबत योग्य त्या सूचना केल्या. यातील मुख्य आरोपी सुनील माने हा सराईत गुन्हेगार असून, दोन वर्षांपूर्वी नातेपुते पोलिस स्टेशनचे तत्कालीन सहायक पोलिस निरीक्षक दत्तात्रय खाडे यांनी त्याच्याविरोधात हद्दपारीचा प्रस्ताव पाठविला होता. (वार्ताहर)