Sangli: डफळापूरमध्ये भीषण स्फोट, दुमजली इमारत उद्ध्वस्त; कारण अस्पष्ट 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 2, 2024 11:50 AM2024-09-02T11:50:07+5:302024-09-02T11:50:31+5:30

मोठा अनर्थ टळला

Massive explosion in Daflapur sangli district two storied building destroyed | Sangli: डफळापूरमध्ये भीषण स्फोट, दुमजली इमारत उद्ध्वस्त; कारण अस्पष्ट 

Sangli: डफळापूरमध्ये भीषण स्फोट, दुमजली इमारत उद्ध्वस्त; कारण अस्पष्ट 

डफळापूर : डफळापूर (ता. जत) येथील मुख्य बाजारपेठेत शनिवारी मध्यरात्री झालेल्या भीषण स्फोटात एक दुमजली इमारत उद्ध्वस्त झाली. दोन दुकानांसह शेजारील घराचे मोठे नुकसान झाले. यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. स्फोटाच्या आवाजाने गाव हादरले. स्फोटाचे नेमके कारण अस्पष्ट असले तरी शौचालयाच्या टाकीतून मिथेन वायूच्या गळतीमुळे हा स्फोट झाल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.

डफळापूर येथील गुरुवार पेठेत मुख्य चौकात राजू मल्लाप्पा एकुंडे यांची दुमजली इमारत आहे. रात्री पती-पत्नी जेवण करून दुसऱ्या मजल्यावर झोपी गेले असताना मध्यरात्री पावणेएकच्या सुमारास पहिल्या मजल्यावर भीषण स्फोट झाला. हा स्फोट इतका मोठा होता की पहिल्या मजल्याला असलेले लोखंडी शटर उडून तीस फूट अंतरावर रफिक आतार यांच्या स्टेशनरी दुकानच्या शटरवर जाऊन आदळले. दोन मजली इमारतीवरील पत्रे बाजारपेठेत उडून पडले. भिंतीला तडे गेले. शौचालयाचे दरवाजे निखळून खाली पडले. पहिल्या मजल्यावरील खुर्चीने पेट घेतला. खिडक्यांच्या काचाही फुटल्या.

दुसऱ्या मजल्यावर झोपलेल्या दाम्पत्याला कोणतीही इजा झाली नाही. त्यांची खोली वगळता इमारतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. घरासमोर स्टेशनरी दुकानाचे शटर व फर्निचर फुटल्याने मोठे नुकसान झाले. घराशेजारील अमजद आतार यांच्या इमारतीलाही तडे गेल्याने नुकसान झाले आहे. मागील बाजूस असलेल्या लक्ष्मण चव्हाण यांच्या घरावर कुंड्या आणि दगड पडून त्यांचेही नुकसान झाले.

मोठा अनर्थ टळला

डफळापूर बाजारपेठेत रोज शेतकरी, ग्रामस्थांची मोठी वर्दळ असते. घटना घडलेल्या ठिकाणी बाजारपेठेचा मुख्य चौक आहे. याठिकाणी जास्त गर्दी असते. ही घटना दिवसा घडली असती तर मोठी जीवितहानी झाली असती.

पोलिसांचा अंदाज

राजू एकुंडे यांनी पंचवीस वर्षांपूर्वी शौचालय बांधले आहे. त्यांनी आजवर एकदाही शौचालयाची टाकी रिकामी करून स्वच्छ करून घेतली नाही. बाहेर हवा जाण्यासाठी छोटी पाइप बसवली होती, ती पाइप ब्लॉक झाल्याने या टाकीतून मिथेन वायूला गळती लागून तो अचानक बाहेर पडल्याने मोठा स्फोट झाल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

ग्रामस्थांची घटनास्थळी गर्दी

रात्री गाढ झोपेत असलेले डफळापूरकर स्फोटाच्या मोठ्या आवाजाने जागे झाले. त्यांच्यात भीतीचे वातावरण पसरले होते. स्फोटाचा आवाज पाच किलोमीटर अंतरापर्यंत गेला. राजू एकुंडे यांचे कुटुंबही घडलेल्या घटनेने भयभीत झाले आहे. बॉम्बस्फोट झाल्याची अफवाही काही काळ पसरली होती.

श्वान पथकाकडून शोध

घटनास्थळी जत पोलिसांनी तातडीने धाव घेतली. सांगलीहून बॉम्ब शोध पथक, श्वान पथक घटनास्थळी दाखल झाले. या घटनेचा अधिक तपास जत पोलिस निरीक्षक सुरेश बिजली करीत आहेत.

Web Title: Massive explosion in Daflapur sangli district two storied building destroyed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.