'भविष्यात दुसरी श्रद्धा वालकर होऊ देणार नाही', लव्ह जिहादविरोधात सांगलीत हिंदू गर्जना मोर्चा
By संतोष भिसे | Published: December 24, 2022 01:48 PM2022-12-24T13:48:17+5:302022-12-24T19:15:54+5:30
घोषणांनी शहर दुमदुमून सोडले
सांगली : लव्ह जिहादविरोधी कायद्यासाठी हिंदुत्ववादी संघटनांनी शनिवारी हिंदू गर्जना मोर्चा काढला. जिल्हाभरातून हजारो महिला व पुरुष सहभागी झाले. भविष्यात दुसरी श्रद्धा वालकर होऊ देणार नसल्याचा इशारा मोर्चेकऱ्यांनी दिला.
राम मंदिर चौकातून सुरु झालेल्या मोर्चामध्ये अखंड घोषणा सुरु होत्या. भगव्या टोप्या घातलेल्या आणि भगवे ध्वज घेतलेल्या महिला अग्रभागी होत्या. लव्ह जिहादविरोधी कायदा झालाच पाहिजे अशा घोषणांनी शहर दुमदुमून सोडले. पंचमुखी मारुती रस्ता, रिसाला रस्ता, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, मारुती रस्ता, कापड पेठ, गणपती मंदिर, गणपती पेठ, शहर पोलीस ठाणे यामार्गे मोर्चा स्टेशन चौकात आला. तेथे पाच युवती व प्रमुख वक्त्यांची भाषणे झाली. तरुणींच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. लव्ह जिहाद व धर्मांतरविरोधी कायद्याची मागणी केली.
मोर्चाचे नेतृत्व आमदार सुधीर गाडगीळ, नितीन शिंदे, नितीन चौगुले, स्वाती शिंदे, मकरंद देशपांडे, निशिकांत पाटील, पृथ्वीराज पवार, नीता केळकर, संगीता खोत, भारती दिगडे, शेखर इनामदार, ओंकार शुक्ल, दिनकर पाटील, मनोहर सारडा आदींनी केले. भाजपच्या नगरसेवकांसह बजरंग दल, शिवसेना, हिंदू एकता आंदोलन आदींचे कार्यकर्ते सहभागी झाले.
दुसरी श्रद्धा वालकर होणार नाही
माजी आमदार नितीन शिंदे म्हणाले, हिंदू एकवटला तर दुसरी श्रद्धा वालकर होणार नाही. सरकारने आजच्या मोर्चाची दखल घेऊन लव्ह जिहादविरोधी कायदा त्वरित करावा. महाविद्यालये, शिकवण्यांसमोर मुलींना हेरण्यासाठी विशिष्ट धर्मीय मुले थांबणार नाहीत याची दक्षता घ्यावी.
सांगली - लव्ह जिहादविरोधी कायद्यासाठी हिंदुत्ववादी संघटनांनी शनिवारी काढला हिंदू गर्जना मोर्चा #Sanglipic.twitter.com/mJ4alt3pQb
— Lokmat (@lokmat) December 24, 2022