पक्व झालेली डाळिंबे पडून फुटू लागली
By admin | Published: January 8, 2015 11:17 PM2015-01-08T23:17:24+5:302015-01-09T00:10:53+5:30
परिस्थिती ‘जैसे थे’ : बाजारात आणलेली कचऱ्यात गेली; उत्पादक चिंताग्रस्त
अविनाश बाड - आटपाडी -पक्व झालेली डाळिंबे दर वाढेल, या आशेने शेतकरी तोडायला तयार नाहीत. १०० ते १५० रुपये किलो दराने जाणारी डाळिंबे सध्या ४० ते ५० रुपयांच्या घरात आहेत. पक्व झालेली डाळिंबे आता आपोआप झाडावरून जमिनीवर पडून फुटत आहेत. त्यातच डाळिंबाचा ज्यूस आणि अनारदाना निर्मिती अन्न आणि भेसळ विभागाने छापे टाकून बंद केली आहे. बाजार समितीत पदरमोड करून शेतकऱ्यांनी डाळिंबे आणली तर, तिथे कचऱ्यात फेकून द्यावी लागत आहेत. पडलेल्या दरामुळे मेटाकुटीला आलेल्या शेतकऱ्यांची व्यथा दूर करण्याचा प्रयत्न कुणीही करताना दिसत नाही. त्यामुळे डाळिंब उत्पादकांना वाली कोण, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
पंधरा दिवसांपासून डाळिंबाच्या बागा पक्व होत आहेत. तालुक्यातील सुमारे १० हजार हेक्टर क्षेत्रात यंदा विक्रमी उत्पादन आले आहे. तेल्या, अवकाळी पाऊस यासह ढगाळ हवामानाचा परिणाम झाल्याने त्याचा डाळिंबावर परिणाम झाला आहे.
डाळिंब हे हमखास उत्पन्न देणारे नगदी पीक. त्यामुळे जरी तेल्या रोग आला तरी, त्यावर महागड्या कीडनाशक, बुरशीनाशक औषधांच्या डझनाने फवारण्या करून आणि महागडी खते घालून चांगल्या दराच्या आशेने शेतकरी डाळिंबाचे उत्पादन घेतात. भरपूर पैसे मिळतील, या आशेने उत्पादनावर शेतकरी कर्ज काढून खर्च करत आहेत.
यंदा मात्र डाळिंबाचा दर ४० ते ५० रुपयांवर चढायला तयार नाही. ४ ते ५ प्रतीमध्ये डाळिंबाची विभागणी केली जाते. पहिल्या, दुसऱ्या क्रमांकाच्या डाळिबाची किलोवर, तर इतर क्रेटवर १० ते १०० रुपयांपर्यंत येथील बाजार समितीच्या सौद्यात विकली जात आहेत. म्हणजे अगदी प्रतिकिलो ५० पैसे, ५ रुपये किलो असा शेतकऱ्यांना दर मिळत आहे. याशिवाय उरलेली डाळिंबे तर फेकून दिली जात आहेत.
लवकरच बैठक घेऊ आणि व्यापारी, अडतदारांना सूचना देऊ, शिवाय शासनाला ज्यूस, अनारदाना निर्मिती बंद झाल्याने शेतकऱ्यांची अवस्था बिकट झाल्याचे कळवू, असे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव एस. यु. जाधव यांनी सांगितले, तर डाळिंबे मोठ्या प्रमाणात विक्रीला येण्याच्या पार्श्वभूमीवर केवळ हप्तेखोरीसाठी अन्न आणि औषध प्रशासनाने छापे टाकून उद्योग बंद केल्याची व्यापाऱ्यांमध्ये चर्चा आहे.
माझी डाळिंबाची ७०० झाडे आहेत. गेली १५ दिवस मी दर वाढायची वाट पाहात आहे. आता डाळिंबे आपोआप जमिनीवर गळून पडायला लागली आहेत. १५-२० दिवसांपासून एकही व्यापारी बागेकडे फिरकला नाही. व्याजाने पैसे काढून मी जागेवर २ लाख रुपये खर्च केले आहेत. गेल्यावर्षी ११० रुपये किलोने डाळिंबे विकली. यंदा ५० रुपयानेही कुणी मागेना. पडलेली २५ क्रेट डाळिंबे आणली. एक क्रेट २५ रुपयालाही जाईना.
- किसन मोटे, शेतकरी बोंबेवाडी
यापूर्वी ८० टक्के डाळिंबे निर्यात होत होती; पण आता केंद्र शासनाने जाचक अटी घातल्याने डाळिंब निर्यात होत आहेत. त्याचा दरावर परिणाम झाला आहे. देशात स्वस्ताई करण्याचा नादात शासनाने डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांना कर्जाच्या खाईत लोटले आहे. ज्यूस आणि अनारदाना निर्मिती बंद असल्याने शेतकऱ्यांना डाळिंबे फेकून द्यावी लागत आहेत.
- पंढरीनाथ नागणे,
अडतदार, मंगलमूर्ती फ्रूट सप्लायर
पाच वर्षांपासून आटपाडीत येऊन येथील डाळिंबे खरेदी करून दिल्ली, लखनौ यासह देशात अनेक भागात पाठवितो. यंदा उत्तरेत थंडीचा कडाका असल्याने डाळिंबांना मागणी कमी आहे. त्या तुलनेत आवक खूप वाढली आहे. त्यामुळे दर कमी आहे; पण शेतकऱ्यांना चांगला दर मिळण्यासाठी शासनाने पुढाकार घ्यावा. शेतकऱ्यांना डाळिंबे कचऱ्यात फेकावी लागत आहेत.
- शमीम अहमद,
डाळिंब व्यापारी, लखनौ