तुती लागवडीसाठी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवावा : डॉ. अभिजीत चौधरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2020 02:14 PM2020-01-15T14:14:12+5:302020-01-15T14:16:15+5:30
तुती लागवडीसाठी लाभार्थ्यांची नाव नोंदणी करण्यासाठी दि. 21 जानेवारी 2020 पर्यंत महारेशीम अभियान-2020 राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत रेशीम उद्योग करु इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांनी दिनांक 21 जानेवारी पर्यंत नाव नोंदणी करावयाची आहे.
सांगली : तुती लागवडीसाठी लाभार्थ्यांची नाव नोंदणी करण्यासाठी दि. 21 जानेवारी 2020 पर्यंत महारेशीम अभियान-2020 राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत रेशीम उद्योग करु इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांनी दिनांक 21 जानेवारी पर्यंत नाव नोंदणी करावयाची आहे.
पात्र शेतकऱ्यांना 1 एकर तुती लागवडी करीता 500 रूपये नोंदणी फी भरून आवश्यक त्या कागदपत्रासह ऑनलाईन नोंदणी करणे आवश्यक आहे. या योजनेमध्ये जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी केले.
महारेशीम अभियान-2020 चा शुभारंभ जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांच्याहस्ते रेशीम उद्योगाबाबत माहिती देण्याऱ्या चित्ररथास जिल्हाधिकारी कार्यालय सांगली येथे हिरवा झेंडा दाखवून करण्यात आला. यावेळी जिल्हा रेशीम विकास अधिकारी प्रकाश पाटील, तांत्रिक कर्मचारी सुनिल पाटील, तानाजी गावडे, शिवाजी खडसरे, मयुर पाटील, तौफिक मुलाणी, सुरेश थोरात, जिल्हा रेशीम कार्यालयामार्फत निवड केलेले शेतकरी उपस्थित होते.
रेशीम उद्योग हा शेती आधारीत असल्याने शेतकऱ्यांच्या मागणीनुसार स्वत:च्या शेतीवर कामकाज करून त्या शेतात केलेल्या कामकाजाचा रोजंदारी मेहनताना शासनाकडून मनरेगाच्या नियमानुसार साप्ताहिक मजुरी तीन वर्षाकरीता दिली जात आहे. सदरचे कामकाज शासनाने ठरवून दिलेल्या मनरेगाच्या निकषानुसार परिपूर्ण करणे गरजेचे आहे.
यामध्ये रेशीम शेतीच्या माध्यमातून उत्पादीत होणाऱ्या कोषापासून होणारे उत्पन्न त्या लाभार्थीस दुहेरी लाभ दिला जात आहे. म्हणजे स्वत:च्या शेतामध्ये कामकाज करून शासनाच्या वतीने रेशीम शेतीशी निगडीत केलेल्या कामकाजाची मजुरी नियमित अदा केली जात आहे. लाभार्थीस शासन नियमानुसार तीन वर्षा करीता साप्ताहिक मजुरी 682 दिवस व 213 दिवस किटक संगोपन गृह बांधकामाच्या कालावधीमध्ये मजुरी अदा केली जाणार आहे. तसेच रेशीम पिकासाठी लागणारे संगापन गृहासाठी कुशल खर्च 1 लाख 10 हजार 780 रूपये नियमानुसार दिला जाणार आहे. या करीता जादा लागणारा खर्च लाभार्थी हिस्सा म्हणून लाभार्थीस स्वत: करावा लागणार आहे.
रेशीम उद्योग योजनेमध्ये मनरेगा अंतर्गत पहिल्या वर्षी मजुरी अकुशल 1 लाख 1 हजार 970 रूपये, सामुग्री अकुशल 81 हजार 210 रूपये असे एकूण 1 लाख 83 हजार 180 रूपये, दुसऱ्या वर्षी मजुरी अकुशल 41 हजार 200 रूपये, सामुग्री अकुशल 19 हजार 285 रूपये असे एकूण 60 हजार 485 रूपये, तिसऱ्या वर्षी मजुरी अकुशल 41 हजार 200 रूपये, सामुग्री अकुशल 10 हजार 285 रूपये असे एकूण 51 हजार 485 रूपये. याप्रमाणे तीन वर्षात मजुरी अकुशल 1 लाख 84 हजार 370 रूपये, सामुग्री अकुशल 1 लाख 10 हजार 780 रूपये असे एकूण 2 लाख 95 हजार 150 रूपये शासकीय अनुदानाचा लाभ आहे.