महापौर बदला; अन्यथा आमचे राजीनामे घ्या
By admin | Published: February 27, 2017 11:39 PM2017-02-27T23:39:52+5:302017-02-27T23:39:52+5:30
काँग्रेस नगरसेवक आक्रमक : नेत्यांशी चर्चा करून लवकरच निर्णय घेण्याची ग्वाही
सांगली : महापौर हारुण शिकलगार यांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त करीत सोमवारी काँग्रेसच्या नगरसेवकांनी त्यांच्या राजीनाम्यासाठी जयश्रीताई मदन पाटील यांना साकडे घातले. मदनभाऊ गटातील १५ नगरसेवक महापौरांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक झाले आहेत. त्यांचा राजीनामा घ्या नाही तर आमचे राजीनामे देऊ, अशी उघड भूमिका घेतल्याने काँगे्रस नेत्यांसमोर पेच निर्माण झाला आहे. अखेर राजीनाम्याबाबत सर्व नेत्यांशी चर्चा करून लवकरच निर्णय घेण्याची ग्वाही देत श्रीमती पाटील यांनी नगरसेवकांची समजूत काढली.
महापौर शिकलगार यांना दहा महिन्यांचा कार्यकाल निश्चित करण्यात आला होता. पण सव्वा वर्षाचा कालावधी झाला तरी त्यांचा राजीनामा घेण्यात आलेला नाही. त्यात काँग्रेसअंतर्गत फाटाफुटीमुळे महापौरांना लॉटरी लागणार, अशीच चर्चा होती. पण आता काँग्रेसमधील मदनभाऊ गटाने महापौरांच्या कारभारावरच नाराजीचा सूर आळवला आहे.
सोमवारी काँग्रेसच्या सांगलीतील १५ नगरसेवकांनी जयश्रीताई पाटील यांची भेट घेतली. यावेळी माजी महापौर कांचन कांबळे, माजी उपमहापौर प्रशांत पाटील-मजलेकर, प्रशांत पाटील, स्थायी समितीचे माजी सभापती राजेश नाईक, संतोष पाटील, नगरसेवक दिलीप पाटील, रोहिणी पाटील, पुष्पलता पाटील, शालन चव्हाण, शेवंता वाघमारे, प्रदीप पाटील, गुलजार पेंढारी आदी उपस्थित होते.
या नगरसेवकांनी जयश्रीताई पाटील यांच्यासमोर महापौरांविरोधातील तक्रारींचा पाढा वाचला. महापौर शिकलगार हे विरोधकांची कामे गतीने करतात. त्यांच्या फायली मंजूर होत आहेत; पण सत्ताधारी गटाच्या नगरसेवकांची कामेच होत नाहीत. स्वत: महापौर व उपमहापौरांच्या प्रभागातील कोट्यवधी रुपयांच्या कामाची निविदा निघाली आहे, तर सर्वसामान्य नगरसेवक कामासाठी हेलपाटे मारत आहेत. मदनभाऊ गटातील नगरसेवकांना महापौरांकडूनच दुजाभावाची वागणूक दिली जात आहे. विरोधकांच्या इशाऱ्यावर त्यांचे कामकाज सुरू आहे, असा गंभीर आरोपही नगरसेवकांनी केला.
नगरसेवकांची आक्रमक भूमिका पाहता जयश्रीताई पाटील यांनी महापौर शिकलगार व गटनेते किशोर जामदार यांनाही बैठकीसाठी बोलाविले. दोन्ही पदाधिकाऱ्यांसमोरच कारभाराचा सोक्षमोक्ष करण्याचा निर्णय घेण्यात आला. दोन्ही पदाधिकारी बैठकस्थळी आल्यानंतरही नगरसेवकांनी त्यांच्यावर प्रश्नांचा भडीमार केला. आयुक्त रवींद्र खेबूडकर यांनी पालिकेचे अंदाजपत्रक सादर करताना गेल्या वर्षातील अनेक तरतुदी वगळल्या आहेत. नगरसेवकांना दिलेला २५ लाखांचा प्रभाग निधीही रद्द केला आहे. ही बाब बेकायदेशीर असतानाही त्यावर पदाधिकारी का मूग गिळून गप्प आहेत, असा प्रश्न उपस्थित केला. प्रशासनाला पाठीशी घातले जात आहे, असा आरोपही नगरसेवकांनी केला.
पुढीलवर्षी महापालिकेच्या निवडणुका होणार आहेत. त्याला सामोरे जाताना शहरातील प्रलंबित प्रश्न प्राधान्याने सोडविण्याची गरज आहे. शिकलगार यांना दिलेला दहा महिन्यांचा महापौरपदाचा कालावधी संपला आहे. त्यामुळे दुसऱ्याला संधी देण्यासाठी त्यांचा राजीनामा घ्यावा. ते राजीनामा देणार नसतील, तर आमचे राजीनामे घ्या, असेही नगरसेवक म्हणाले.
यावर जयश्रीताई पाटील म्हणाल्या की, महापौरांचा राजीनामा घेण्याबाबत आमदार पतंगराव कदम व कॉंग्रेसच्या इतर नेत्यांशी दोन दिवसांत चर्चा करू. या निवडीत पुन्हा दगाफटका होणार नाही, याचीही खबरदारी घ्यावी लागणार आहे. त्यामुळे सर्व नेत्यांना विश्वासात घेऊन निर्णय होईल, असे स्पष्ट केले. (प्रतिनिधी)