महापौर, उपमहापौरांची ७ फेब्रुवारीस निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2020 03:47 PM2020-01-24T15:47:54+5:302020-01-24T15:49:11+5:30
सांगली महापालिकेच्या महापौर, उपमहापौरांची ७ फेब्रुवारीला निवड होण्याची शक्यता आहे. नगरसचिव कार्यालयाने तसा प्रस्ताव विभागीय आयुक्तांकडे पाठविला आहे. त्यांच्या मान्यतेनंतर प्रत्यक्ष निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होणार आहे. दरम्यान, महापौर पदासाठी इच्छुकांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालल्याने सत्ताधारी भाजप नेत्यांची डोकेदुखी वाढणार आहे.
सांगली : महापालिकेच्या महापौर, उपमहापौरांची ७ फेब्रुवारीला निवड होण्याची शक्यता आहे. नगरसचिव कार्यालयाने तसा प्रस्ताव विभागीय आयुक्तांकडे पाठविला आहे. त्यांच्या मान्यतेनंतर प्रत्यक्ष निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होणार आहे. दरम्यान, महापौर पदासाठी इच्छुकांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालल्याने सत्ताधारी भाजप नेत्यांची डोकेदुखी वाढणार आहे.
महापालिकेत भाजपचे संख्याबळ ४१ आहे. त्याशिवाय दोन अपक्षांचाही भाजपला पाठिंबा आहे, तर काँग्रेस व राष्ट्रवादीचे ३५ नगरसेवक आहेत. पहिल्यांदाच महापालिकेची सत्ता भाजपच्या हाती आली आहे. दीड वर्षाच्या कार्यकालानंतर संगीता खोत व धीरज सूर्यवंशी यांनी महापौर, उपमहापौर पदाचे राजीनामे सोमवारच्या महासभेत दिले. त्यानंतर नूतन पदाधिकारी निवडीसाठी हालचाली गतिमान झाल्या आहेत.
दरम्यान, महापालिकेच्या नगरसचिव कार्यालयाने पदाधिकारी निवडीचा प्रस्ताव मंजुरीसाठी विभागीय आयुक्तांकडे पाठविला आहे. या प्रस्तावात पदाधिकारी निवडीसाठी ७ फेब्रुवारी ही तारीख निश्चित केली आहे. विभागीय आयुक्तांनी नगरविकासच्या प्रस्तावावर शिक्कामोर्तब केल्यास याचदिवशी निवडी पार पडण्याची शक्यता आहे.
महापौर व उपमहापौर पदासाठी सत्ताधारी भाजपमध्ये इच्छुकांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. महापौर पदासाठी सुरुवातीला सविता मदने, गीता सुतार, कल्पना कोळेकर यांची नावे चर्चेत होती, पण आता लक्ष्मी सरगर, अनारकली कुरणे यांनीही महापौर पदाची मागणी केली आहे.
इच्छुकांची यादी वाढतच चालली आहे. उपमहापौर पदासाठी कुपवाडमधून प्रकाश ढंग, मिरजेतून पांडुरंग कोरे, शिवाजी दुर्वे, आनंदा देवमाने यांची नावे चर्चेत आहेत. त्यातच भाजपचे सहयोगी सदस्य विजय घाडगे व गजानन मगदूम यांनीही उपमहापौर पदासाठी फिल्डिंग लावली आहे. प्रत्यक्ष निवडीचा कार्यक्रम जाहीर होईपर्यंत इच्छुकांच्या यादीत आणखी काही नावांची भर पडणार आहे. त्यामुळे पदाधिकारी निवडीत भाजपच्या नेत्यांची डोकेदुखी वाढणार आहे.