महापौर, उपमहापौरांचा राजीनामा

By Admin | Published: January 18, 2015 12:25 AM2015-01-18T00:25:25+5:302015-01-18T00:29:32+5:30

मदन पाटील यांचे आदेश : इच्छुकांची मोर्चेबांधणी सुरू

Mayor, Deputy Mayor resigns | महापौर, उपमहापौरांचा राजीनामा

महापौर, उपमहापौरांचा राजीनामा

googlenewsNext

सांगली : सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेच्या महापौर कांचन कांबळे व उपमहापौर प्रशांत पाटील-मजलेकर यांनी आज, शनिवारी महासभेत पदांचा राजीनामा दिला. पालिकेतील सत्ताधारी गटाचे नेते, माजी मंत्री मदन पाटील यांच्या सूचनेनंतर त्यांचे राजीनामे घेण्यात आले. दोन्ही पदाधिकाऱ्यांनी दीड वर्षांतील कामगिरीबद्दल समाधान व्यक्त केले. आता नव्या महापौर व उपमहापौरपदासाठी इच्छुकांनी मोर्चे बांधणीला सुरुवात केली आहे.
महापालिकेच्या २०१३ मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत सांगलीच्या जनतेने काँग्रेसकडे एकहाती सत्ता सोपविली. तेव्हा पालिकेचे महापौरपद मागासवर्गीय गटासाठी आरक्षित होते. विधानसभेच्या २०१४ मधील निवडणुकीचे राजकीय गणित मांडत काँग्रेस नेते मदन पाटील यांनी महापौर, उपमहापौर आणि स्थायी समितीचे सभापती ही तिन्ही पदे सांगलीकडे ठेवण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर महापौरपदी कांचन कांबळे यांना, तर उपमहापौरपदी प्रशांत पाटील-मजलेकर यांना संधी देण्यात आली होती. महापौर कांबळे यांनी १८ आॅगस्ट २०१३ रोजी पदभार स्वीकारला. विधानसभा निवडणुकीनंतर महापौर व उपमहापौरांच्या राजीनाम्याची चर्चा सुरू झाली होती.
गेल्या काही दिवसांपासून महापौर, उपमहापौरांच्या राजीनाम्याबाबत उलटसुलट चर्चा सुरू होती. नेत्यांचे आदेश येताच राजीनामा देऊ, अशी भूमिका महापौर कांबळे यांनी घेतली होती. त्यामुळे आजच्या महासभेत त्यांचा राजीनामा होणार का? याविषयी उत्सुकता होती. महासभा सुरू होण्यापूर्वी दुपारी सव्वादोनच्या सुमारास मदन पाटील यांनी गटनेते किशोर जामदार यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला. पाटील यांनी महापौरांसह उपमहापौरांचा राजीनामा घेण्याचे आदेश जामदार यांना दिले. त्यानंतर जामदार यांनी या दोन्ही पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून राजीनामा पत्र तयार केले. महासभा संपल्यानंतर सायंकाळी पाचच्या सुमारास दोन्ही पदाधिकाऱ्यांनी राजीनाम्याची घोषणा केली.
विवेक कांबळे यांना संधी
दोन्ही पदांसाठी आता इच्छुक नगरसेवक सरसावले आहेत. महापौरपदासाठी मिरजेतील ज्येष्ठ नगरसेवक विवेक कांबळे यांचे नाव सर्वांत आघाडीवर आहे. कांबळे यांनी आज, शनिवारी सकाळीच मदन पाटील यांची भेट घेतली होती. राजीनाम्यानंतर सायंकाळी त्यांनी काँग्रेसचे नेते आमदार पतंगराव कदम यांच्याशीही चर्चा केली. त्यामुळे त्यांच्याच नावावर शिक्कामोर्तब होईल, अशी चर्चा पालिका वर्तुळात सुरू आहे.
मजलेकरांना मुदतवाढ?
मावळते उपमहापौर प्रशांत पाटील-मजलेकर यांना मुदतवाढ देण्याची मागणी काँग्रेसच्या नगरसेवकांकडून केली जाणार आहे. तसे संकेत सांगलीतील नगरसेवकांनी आज त्यांच्या राजीनाम्यानंतर दिले. मजलेकरांनी तयारी दर्शविल्यास नेत्यांना साकडे घालू, असेही काही नगरसेवकांनी सांगितले. उपमहापौरपदासाठी कुपवाडचे नगरसेवक प्रशांत पाटील हेही इच्छुक आहेत. त्यामुळे या पदावर कोणाला संधी याची उत्सुकता लागली आहे.
प्रजासत्ताकदिनापूर्वी निवडी
महापौर, उपमहापौरांच्या राजीनाम्यानंतर सत्ताधारी गटाने नव्या पदाधिकारी निवडीसाठी हालचाली गतिमान केल्या आहेत. २६ जानेवारीपूर्वी या निवडी व्हाव्यात, यासाठी प्रयत्न चालविले आहेत. त्यासाठी आयुक्तांकडून दोन्ही पदाधिकाऱ्यांचे राजीनामे मंजूर करून नव्या निवडीसाठी विभागीय आयुक्तांना फॅक्सद्वारे पत्र पाठविले जाणार आहे. गटनेते किशोर जामदार यांनी ही माहिती दिली.

Web Title: Mayor, Deputy Mayor resigns

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.