राष्ट्रवादी लढणार महापौर निवडणूक
By admin | Published: January 26, 2016 12:57 AM2016-01-26T00:57:41+5:302016-01-26T01:01:55+5:30
सांगलीत बैठक : जयंत पाटील यांनीही दिला हिरवा कंदील; १ रोजी उमेदवार निश्चिती
सांगली : महापालिकेच्या महापौैर, उपमहापौर पदाची निवडणूक स्वबळावर लढवावी, अशी मागणी सोमवारी राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी आ. जयंत पाटील यांच्यासमोर केली. त्यांना प्रतिसाद देत, येत्या १ फेब्रुवारीस राष्ट्रवादीचा उमेदवार निश्चित करण्याचे आश्वासन जयंत पाटील यांनी यावेळी दिले.
सांगलीच्या माधवनगर रस्त्यावरील विश्रामगृहात सोमवारी सायंकाळी ही बैठक पार पडली. राष्ट्रवादीचे सर्व नगरसेवक यावेळी उपस्थित होते. यावेळी सर्वांनी महापौर व उपमहापौर निवडणुकीचा विषय उपस्थित केला. अनेक नगरसेवकांनी स्वबळावर या निवडणुका लढविण्याची मागणी केली. काँग्रेसमध्ये सध्या गटबाजी सुरू आहे. नाराजीही दिसत आहे. मदन पाटील यांच्या निधनानंतर सत्ताधारी पक्ष विस्कळीत झाला आहे. त्यामुळे महापौर व उपमहापौर निवडीत राष्ट्रवादीचा उमेदवार विजयी होऊ शकतो. काँग्रेसचाच एक गट नाराजीतून पाठिंबा देऊ शकतो. त्यामुळे यावेळी निवडणूक कोणत्याही परिस्थितीत लढविणे गरजेचे आहे, असे मत सदस्यांनी मांडले.
काही नगरसेवकांनी सत्ताधाऱ्यांच्या भ्रष्ट कारभारावर टीका केली. अशाप्रकारचा कारभार करणाऱ्यांना कोणत्याही परिस्थितीत पाठिंबा देण्यात येऊ नये, तसे झाले तर त्यांच्या अशा गोष्टींनाही पाठिंबा दिल्यासारखे होईल. त्यामुळे एकसंधपणे विरोधकाची सक्षम भूमिका घेऊन ही निवडणूक लढवावी, अशी सूचना काहींनी मांडली. विरोधी पक्षनेते दिग्विजय सूर्यवंशी, विष्णू माने, मैनुद्दीन बागवान, अभिजित हारगे, राजू गवळी यांनी आक्रमकपणे भूमिका मांडली. जयंत पाटील यांनीही त्यांची दखल घेत, निवडणूक लढविण्यासाठी हिरवा कंदील दर्शविला. त्यानंतर उमेदवार निवडीचे सर्व अधिकार जयंत पाटील यांना देण्यात आले. इच्छुकांनी त्यांची नावे एसएमएसद्वारे कळवावीत, असे आवाहन जयंत पाटील यांनी केले. १ फेब्रुवारीस पुन्हा सांगलीत यासंदर्भात बैठक घेतली जाईल, या बैठकीत चर्चा करून उमेदवार निवडला जाईल, असे जयंत पाटील यांनी सांगितले. त्यामुळे आता १ फेब्रुवारीस होणाऱ्या बैठकीकडे राष्ट्रवादी सदस्यांचे लक्ष लागून राहिले आहे. (प्रतिनिधी)
आक्रमक व्हा : जयंतरावांची सूचना
बैठकीत नगरसेवकांना मार्गदर्शन करताना जयंतराव म्हणाले, विरोधक म्हणून प्रत्येकाने महापालिकेत सक्षम झाले पाहिजे. आक्रमकपणे लोकांच्या प्रश्नावर भांडले पाहिजे. लोकहिताचा दृष्टिकोन ठेवून वाटचाल करावी. महापालिकेच्या सर्वसाधारण सभांबरोबरच दैनंदिन कामातही सदस्यांचा लोकांच्या कामासाठी आक्रमकपणा दिसायला हवा. व्यक्तिगत कामासाठी असा आक्रमकपणा नको.
इच्छुकांना निकष कसा?
काँग्रेसच्या इच्छुकांमध्ये नगरसेवक राजेश नाईक, हारुण शिकलगार आणि सुरेश आवटी यांचा समावेश आहे. शिकलगार सध्या जिल्हा नियोजन समितीवरही आहेत. या तिन्ही उमेदवारांनी स्थायी समितीचे सभापतीपद भूषविले आहे. त्यामुळे पूर्वीचा पदांचा निकष आता संपुष्टात आला आहे. कालावधीचा विचार करता, नाईक यांना अन्य दोघांपेक्षा सभापतीपदी कमी कालावधी मिळाला असल्याने, नाईक यांचे समर्थक सध्या दावेदारी मजबूत करीत आहेत.
स्वबळाची भूमिका कायम राहणार का?
विद्यमान महापौर विवेक कांबळे यांच्या निवडणुकीवेळीही राष्ट्रवादीने स्वबळाचा नारा दिला होता. ऐनवेळी त्यांनी या भूमिकेतून माघार घेतली. त्यामुळे यावेळच्या महापौर पदाच्या निवडणुकीत ही भूमिका कायम राहणार का?, असा प्रश्न काही राष्ट्रवादीच्याच नगरसेवकांना यावेळी पडला होता. बैठकीनंतर एकाने याबाबत तशी खंत व्यक्त करताना, नाव प्रसिद्ध न करण्याची विनंती केली.
विविध संघटनांशी केली चर्चा
यावेळी विश्रामगृहावर शहरातील विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनीही जयंत पाटील यांची भेट घेतली. त्यांच्यात काय चर्चा झाली, याची माहिती नगरसेवकांनाही नव्हती.