'वाळवा तालुक्यात विरोधकांना संपवण्यासाठी गुंडशाही व्यवस्था', इस्लामपूरच्या नगराध्यक्षांचे मंत्री पाटलांवर टीकास्त्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2022 12:37 PM2022-01-04T12:37:15+5:302022-01-04T12:38:12+5:30
राजकारणातील प्रस्थापितांची ही गुंडशाही मोडून काढण्यासाठी चांगल्या आणि शिक्षित मंडळींनी राजकारणात यायला हवे.
इस्लामपूर : विचारांची लढाई विचारानेच लढली पाहिजे. मात्र वाळवा तालुक्यात विरोधकांना नेस्तनाबूत करा, त्यांना संपवा किंवा त्यांना निर्माणच होऊ देऊ नका, अशी व्यवस्था असल्याची टीका जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांचे नाव न घेता नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांनी केली.
राजकारणातील प्रस्थापितांची ही गुंडशाही मोडून काढण्यासाठी चांगल्या आणि शिक्षित मंडळींनी राजकारणात यायला हवे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. येथे ज्येष्ठ निवेदक सुधीर गाडगीळ यांनी पाटील यांची प्रकट मुलाखत घेतली.
पाटील म्हणाले की, वडिलांच्या अकाली निधनाने वयाच्या १८ व्या वर्षीच कौटुंबिक जबाबदारी आली. त्यानंतर तीन वर्षांनी अनुकंपा तत्त्वावर वीज मंडळात भरती झालो. वडील प्रकाशतात्यांनी राज्यभरात उभारलेली इंटकची संघटना समर्थपणे पुढे चालविली. चुलते दिवंगत अशोकदादा पाटील यांचा स्पष्टवक्तेपणा, माजी खासदार प्रकाशबापू पाटील यांचे मृदु बोलणे आणि सालस स्वभाव तर माजी मंत्री अण्णासाहेब डांगे यांचे प्रशासकीय कामाचे कौशल्य याचा माझ्यावर प्रभाव आहे.
शहरातील मातब्बरांची झुंडशाही, गुंडगिरी आणि सामान्यांची पिळवणूक अशा वेदनेतून ईर्षा निर्माण झाली आणि त्याच ईर्षेतून लोकनियुक्त नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत जनतेने मला विजयी केले. विधानसभा निवडणुकीतही विघातक प्रवृत्ती नाहीशा झाल्या पाहिजेत, यासाठी निवडणूक लढलो.
यावेळी माजी मंत्री शिवाजीराव नाईक, भगवानराव साळुंखे, पृथ्वीराज पवार, जयराज पाटील, धैर्यशील मोरे, वैभव पवार, चंद्रकांत पाटील, मधुकर हुबाले, अशोकराव खोत, अजित पाटील, अक्षय पाटील उपस्थित होते. संदीप सावंत यांनी आभार मानले.
सोज्वळ चेहरा आणि टेरर गॅँग..
इस्लामपूरसारख्या छोट्या शहरात एमबीबीएस वैद्यकीय महाविद्यालय होऊच नये यासाठी अनेक यंत्रणा काम करत होत्या. मात्र जुलै २०१६मध्ये या महाविद्यालयास दिल्लीतून परवानगी मिळाली, तो क्षण आनंदाचा ठरला. इथले नेतृत्व सोज्वळ चेहरा पुढे करून टेरर गॅँगची भाषा वापरते. सज्जन असणे आणि सज्जन असल्याचे दाखविणे यातील फरक नवी पिढी ओळखते. त्यामुळे अशा विघातक प्रवृत्ती राजकारणातून उखडून फेकल्या जातील, असे निशिकांत पाटील म्हणाले.