एलबीटीवरील स्थगिती उठविण्यास महापौरांचा विरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2021 04:26 AM2021-03-18T04:26:42+5:302021-03-18T04:26:42+5:30
सांगली : महापालिका प्रशासनाने एलबीटी वसुली व असेसमेंट तपासणीवरील स्थगिती उठविण्यासाठी नगरविकास मंत्रालयाशी पत्रव्यवहार केला आहे. पण महापौर दिग्विजय ...
सांगली : महापालिका प्रशासनाने एलबीटी वसुली व असेसमेंट तपासणीवरील स्थगिती उठविण्यासाठी नगरविकास मंत्रालयाशी पत्रव्यवहार केला आहे. पण महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांनी मात्र स्थगिती उठविण्यास विरोध केला असून, बुधवारी मुंबईत पालकमंत्री जयंत पाटील यांची भेट घेऊन त्यांना निवेदनही दिले.
गेल्या दोन वर्षांपासून महापालिकेचा एलबीटी वसुली व असेसमेंट तपासणीला शासनाची स्थगिती आहे. त्यामुळे महापालिकेचे जवळपास पंधरा ते वीस कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. महापालिका प्रशासनाने ही स्थगिती उठवावी यासाठी नगरविकास विभागाने पत्रव्यवहार सुरू केला आहे. त्याला व्यापारी एकता असोसिएशनचा विरोध आहे. असोसिएशनचे अध्यक्ष समीर शहा यांनी कोरोना व महापुरामुळे व्यापाऱ्यांचे दोन वर्षांत मोठे नुकसान झाले आहे. त्यात एलबीटीची वसुली करून संपूर्ण बाजारपेठच उद्ध्वस्त करण्याचा डाव असल्याचा आरोप करीत हा निर्णय तत्काळ रद्द करण्याची मागणी केली आहे. तर मिरज व्यापारी असोसिएशने मात्र व्यापाऱ्यांना त्रास न देता वसुली होणार असेल तर समर्थन करू, अशी भूमिका घेतली आहे.
दरम्यान, महापौर सूर्यवंशी यांनी बुधवारी मुंबईत पालकमंत्री जयंत पाटील यांची भेट घेतली. यावेळी एलबीटी स्थगितीबाबत चर्चा झाली. महापौरांनीही एलबीटी वसुलीवरील स्थगिती उठविण्यास विरोध केला. ते म्हणाले की, सध्या कोरोनामुळे व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यात एलबीटीपोटी महापालिकेला दरमहा उत्पन्न मिळत आहे. त्यामुळे ही स्थगिती कायम ठेवावी, अशी विनंती पालकमंत्र्यांना केली आहे. त्यांनी यासंदर्भात नगरविकास मंत्र्यांशी चर्चा करण्याचे आश्वासन दिले आहे.